पुणे – पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्याला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. युएसए क्रिकेट लीगमध्ये शेअर्स मिळवून देण्याचे आमिष दाखवत पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याची फसवणूक करण्यात आली आहे. मुंबईतील ५ जणांनी मिळून अमेरिकेतील क्रिकेट लीगमध्ये टीम विकत घेऊन देतो यासाठी १ कोटी रुपयांची मागणी केली होती. याबाबत आशिष काटे (४१) यांनी या पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी सौरभ पांडे, वंदना कृष्णा, राशिद खान, सिराज हुसेन, विक्रम हुसेन यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची ब्रेनस्टॉर्म नावाची कंपनी आहे. आरोपी आणि फिर्यादी कांटे यांची ओळख झाली. त्यावेळी त्यांच्यात युएसए (USA) क्रिकेट लीग बद्दल चर्चा झाली होती. या सर्व आरोपींनी युएसए क्रिकेट कौन्सिलकडे २०-२० क्रिकेट प्रकारात संघ मिळवून देतो तसेच क्रिकेट लीग मधील ४० टक्के शेअर्स मिळवून देतो असे आमिष दाखवत कांटे यांच्याकडे १ कोटी रुपयांची मागणी केली.
हा सगळा प्रकार जानेवारी २०१९ पासून सुरु होता. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३४, ४०६, ४२० अंतर्गत अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.