कोल्हापूर – शहरातील कदमवाडी भागात असणाऱ्या शाळेतील एका शिक्षकांस शाळेबाहेर बोलावून ठार मारण्याचा प्रयत्न केला. हे कृत्य चार ते पाच जणांच्या टोळक्याने आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास केले. याबाबत घटनास्थळावर मिळालेली अधिक माहिती अशी कदमवाडी येथील सुसंस्कार शिक्षण प्रसारक मंडळाच्या ‘माझी शाळा’ या शाळेत शिक्षक असलेल्या संजय सुतार यांना चार ते पाच जणांच्या टोक्याने शाळेबाहेर बोलवून त्याच्यावर कोयत्याचे वार आणि दगड डोक्यात घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
कदमवाडी परिसरातील सुसंस्कार शिक्षण प्रसारक मंडळाच्या ‘माझी शाळा’ या शाळेच्या लगत असलेल्या गल्लीत चार ते पाच जणांच्या टोळक्याने शाळेतील शिक्षक संजय सुतार यांना बाहेर बोलवले आणि त्याच्यावर थेट कोयत्याने वार केले तसेच त्याच्या डोक्यात एक दगडही घातला यामुळे कोयत्याचा वार मानेवर बसला तसेच दगडामुळे डोक्याला ही गंभीर जखम झाली यामुळे शिक्षक संजय सुतार हे गंभीर जखमी झाले. शाळेतील एका विद्यार्थ्याला रागवल्याच्या कारणावरून त्या विद्यार्थ्यांच्या भावानेच हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.
किरकोळ कारणावरून थेट शिक्षकांचा खून करण्याचा केलेल्या या प्रयत्नामुळे कोल्हापूर शहरात खळबळ माजली आहे. शिक्षकांवर झालेल्या खुनी हल्ल्याचे वृत्त समजताच घटनास्थळी विद्यार्थी, शिक्षक, पालक, नागरिकांची गर्दी जमली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेले शिक्षक संजय सुतार यांना तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या खुनी हल्ल्याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा शोध घेत आहेत.