विवेक ताम्हणकर, कोंकण
सिंधुदुर्ग हा देशातला तसा पहिलाच पर्यटन जिल्हा. १९९९ साली या जिल्ह्याला पर्यटनाचा दर्जा मिळाला. राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे त्यात मोठे योगदान आहे.
परंतु गेल्या २१ वर्षाच्या कालावधीत इथला पर्यटन व्यवसाय कितपत बहरला याचा मागोवा घेतल्यास हाताला फारस काही लागत नाही. राणे यांच्या प्रयत्नाने सी-वर्ल्ड प्रकल्प सिंधुदुर्गात मंजूर झाला होता.

राज्यातल्या त्यावेळच्या भाजपा शासनाने तो जवळ जवळ बासनात गुंडाळला. आता कोकणकिनारपट्टटीवर जलवहातूकीने पर्यटन व बंदराचा व्यवसायीक विकास व्हावा याकरता राज्य सरकारने पावले उचलायला सुरवात केली आहे.
नुकतीच राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून मालवण येथील इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अँक्वाटीक स्पोर्टस (इसदा) या संस्थेला एक बोट देण्यात आली.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या बोटीचे उदघाटन झाले. या बोटीच्या माध्यमातून येथील पर्यटनाला दिला गेलेला हा उतारा प्रत्यक्षात कितपत फायदेशीर ठरतो हे महत्वाचे आहे.

सिंधुदुर्गातील समुद्राखालचे विश्व जैवविविधतेने नटलेले आहे. वेंगुर्ले-निवतीपासून विजयदुर्गपर्यंत समुद्राच्या खाली अनेक प्रकारची प्रवाळे, दुर्मीळ मासे यांचा खजिना आहे. काही ठिकाणी खडकाळ भाग आहे. तेथे तर फारच सुंदर जैवविश्व आहे.
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्व समुद्रकिनाऱ्यांचा पर्यावरणाच्या दृष्टीने अभ्यास केला. यात सिंधुदुर्गातील समुद्रात दुर्मीळ अशी मत्स्यसंपत्ती असल्याचे लक्षात आले.
जगात काही मोजक्याच ठिकाणी आढळणारे समुद्रीवड, समुद्रीगवत सिंधुदुर्गातील समुद्राच्या पोटात अनेक ठिकाणी आहे. सिंधुदुर्गातील किनारी भागात आतापर्यंत गोळा केलेल्या सर्वेक्षणावरून असे आढळले आहे की, सागरी प्राण्यांचे १९८ प्रकार या भागात आहेत.
त्यात स्पंज, समुद्री फूल, समुद्री पंखा, प्रवाळ, विविध प्रकारचे मासे, खेकडे, कासव, जिवंत शेवाळ यांचा समावेश आहे.

सिंधुदुर्गाच्या सागरी हद्दीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण स्पॉट आहेत. यात निवती रॉक सर्वाधिक आकर्षण ठरेल असा भाग आहे. वेंगुर्ले आणि निवती येथून या ठिकाणी बोटीतून पोहोचायला ३० ते ४० मिनिटे लागतात. या ठिकाणी खडकांची दोन ते तीन बेटे आहेत.
पोर्तुगीजांनी या ठिकाणी जलवाहतुकीच्या सोयीसाठी दीपगृह उभारले होते. याची नोंद जलवाहतुकीच्या जागतिक नकाशामध्ये राहील.
कालांतराने त्सुनामीमुळे हे दीपगृह उद्ध्वस्त झाले. त्याचे अवशेष आजही त्या ठिकाणी आहेत. नंतर ब्रिटिशांनी जवळच्या दुसऱ्या खडकाळ बेटावर सध्या कार्यरत असलेले दीपगृह उभारले. याच्या बाजूला आणखी एक खडकाळ गुहांचा भाग आहे.

तेथे काही वर्षापूर्वी स्वीफ्ट पक्ष्यांच्या घरट्यांच्या तस्करीचा प्रकार उघड झाला होता. हा भाग वरून जेवढा गूढ आणि सुंदर दिसतो, त्यापेक्षा कित्येक पटीने सुंदर तेथील समुद्रविश्व आहे.
निवती रॉक परिसरात वर दिसणारे खडक म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. या खालचा भाग वेगवेगळ्या आकाराचे खडक, गुहा यांनी भरलेला आहे. सूर्याची किरणे पोहोचतात तिथपर्यंत असलेले सागरी जैववैविध्य स्वर्गापेक्षा कमी नाही.
येथे अनेक प्रकारचे रंगीबेरंगी मासे आहेत. यात शार्क, बटरफ्लाय फिश, स्नॅपर्स, बाराकुडा, ग्रुपर आदींचा समावेश आहे. विविध प्रकारची शैवाले, प्रवाळे आहेत.
या ठिकाणी बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी पर्यटनासाठी वापरण्याचा राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. आमदार दीपक केसरकर अर्थ राज्यमंत्री असताना राज्य सरकारने अर्थसंकल्पात या पाणबुडीसाठी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. अमेरिका, बाली, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये असे प्रयोग झाले आहेत.
आपल्याकडे अंदमान निकोबारमध्ये पाणबुडी पर्यटनासाठी वापरल्याचे सांगितले जाते; पण ती पाणबुडी नसून बोटच म्हणावी लागेल; कारण ती समुद्राच्या पृष्ठभागावरच तरंगते. स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून समुद्राच्या आत जाता येऊ शकते; मात्र स्कूबा डायव्हिंगवर पर्यटकाच्या क्षमता प्रभाव टाकतात.
स्कूबाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार १२ वर्षाखालील मुलांना याचा वापर करता येत नाही. वृद्ध, उच्चदाबाचे रुग्ण, महिला याही स्कूबाचा पूर्ण आनंद घेऊ शकत नाही. याऐवजी पारदर्शक पाणबुडीमधून सर्व वयोगटातील पर्यटकांना समुद्राच्या पोटात जाऊन हे विश्व अनुभवता येणार आहे.
याबाबत लवकरच विचार केला जाईल असे आदित्य ठाकरे मालवण दौऱ्यात म्हणाले आहेत.
आता सरकारने स्कूबा डायव्हिंगला मदतगार ठरण्यासाठी अत्याधुनिक बोट दिली आहे. राज्यातील साहसी पर्यटनाला चालना देणे, स्थानिकांसाठी पर्यटनाच्या संधी निर्माण करणे आणि साहसी पर्यटन अधिक रोमांचकारी बनविणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन मालवण येथील इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अँक्वाटीक स्पोर्टसच्या (इसादा) माध्यमातून निवति रॉक जवळीक समुद्री तळाचे अंतरंग न्याहाळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताफ्यात हि एक अत्याधुनिक बोट दाखल झाली आहे.
सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्याच्या योजनेतील हा पहिला टप्पा समजला जात आहे. आंध्रप्रदेश मधील पुंदुचेरी येथील शिपयार्ड मधून ही बोट घेऊन डॉ. सारंग कुलकर्णी निघाले मालवणमध्ये दाखल झाले आणि पर्यटन व्यावसायिकांच्या अपेक्षा आणखीनच रुंदावल्या आहेत.
मालवण येथील एमटीडीसीच्या स्कुबा डायव्हिंग सेंटर मधून पर्यटकांना नीवती रॉक जवळील समुद्रात दर्जेदार स्कुबा डायव्हिंग घडवून आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जात आहेत.
परंतु नीवती रॉक जवळ पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी अत्याधुनिक बोटीची गरज भासत होती. याची उणीव भरून काढण्यासाठी शासनाने हि बोट दिली आहे. आता इसदाच्या ताफ्यात अत्याधुनिक स्कुबा बोट दाखल झाल्याने जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे.