पुणे – मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या तरुणाचा स्वमिंग पुलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जुना खंडाळा घाटात असणाऱ्या एका खाजगी बंगल्यात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी लोणावळा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
निखिल निकम असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून लोणावळा परिसरात अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निखिल हा त्याच्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी जुना खंडाळा घाटातील एका बंगल्यात आले होते. वाढदिवस साजरा करताना तो मित्रांसोबत दारू प्यायला होता. दारूच्या नशेत तो स्विमिंग पूल शेजारी गेला आणि तोल जाऊन तो स्विमिंग पुलमध्ये पडला. त्याला पोहता येत नसल्याची माहिती समोर येत असून त्यामुळेच बुडून त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
निखिल निकम हा पिंपरी चिंचवड येथील थेरगाव येथे राहणारा होता. तो उच्च शिक्षित असून तो आय टी कंपनीत काम करत होता. मित्रांसोबत तो लोणावळ्यात पार्टीसाठी आला होता. मात्र दारू पिल्यामुळे तोल गेला आणि स्विमिंग पुल मध्ये पडुन त्याचा मृत्यू झाला. मित्रांनी त्याला रुग्णालयात हलविले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे लोणावळा परिसरात एकच खळबळ उडाली होती. वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले सर्व मित्र पिंपरी चिंचवड परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. दारू पिऊन कुणीही पाण्याच्या आसपास जाऊ नये स्विमिंग पुलाजवळ जाऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.