विवेक ताम्हणकर, कोंकण
प्रेरणेला अनुभव किंवा वयाची अट नसते. प्रेरणा म्हणजे खरं तर, अंतर्बाह्य मनोमिलन असते. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात आदिवासी कातकरी मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी काम करणाऱ्या श्रमिक सहयोग या संस्थेच्या कोळकेवाडी येथील प्रयोगभूमीत नुकत्याच पार पडलेल्या श्रमानुभव शिबिराच्या निमित्ताने श्रमानुभवाच्या आनंदोत्सवाबाबत सांगताहेत संस्थेचे संस्थापक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजन इंदुलकर.

अलीकडेच हृषिकेश पाळंदे या तरुण लेखकाची भेट आणि ओळख झाली. शहरात लहानाचा मोठा झालेला हृषिकेश गेली तीन-चार वर्षांपासून कोकणातील एका गावात राहतो. आपल्या आवडीच्या वाचन-लेखना सोबतच गावातील शेतकऱ्यांकडे मोलमजुरी करणे हे त्याने जाणीवपूर्वक स्वीकारलेले चरितार्थाचे साधन आहे. यात त्याला कोणताही कमीपणा किंवा मोठेपणाही वाटत नाही.
पांढरपेशी पदवी घेतलेल्या तरुणाने हे असे करणे म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे असे अनेकांना वाटू शकते. कारण भारतातील शिक्षण व्यवस्थेने येथील परंपरेला अनुसरून शारीरिक श्रम विकून चरितार्थ करणे हे निकृष्ट दर्जाचे काम आहे असे आपल्या सर्वांच्या मनात खोलवर कोरलेले आहे.
त्यामुळे शिक्षण घेणे म्हणजे बुद्धीजीवी होणे असा आपला पारंपारिक समज अधिक भक्कम झालेला आहे. एका बाजूला ही परंपरा पाळताना, दुसऱ्या बाजूला, परदेशातील शिकणारी मुले सुट्टीच्या काळात मजुरीची कामे करतात याचे आपल्याला मोठेच कौतुक वाटते हे विशेष. यामागील आपली ही मानसिकता ‘शिवाजी जन्माला यावा, पण दुसऱ्याच्या घरात’ अशा स्वरुपाची आहे असेच म्हणता येईल.

ही परंपरा तुटावी, भ्रम तुटावा या हेतूने खरं तर श्रमानुभव शिबिराची संकल्पना आम्ही तयार केली आणि अंमलात आणली. हृषिकेश आणि मल्हार या वेगळी वाट चोखाळणाऱ्या तरुणांशी झालेल्या चर्चेतून या शिबिराने आकार घेतला.
२३ ते २६ मे २०२२ असे चार दिवस हे शिबीर कोकणात काम करणाऱ्या श्रमिक सहयोग संस्थेने प्रयोगभूमी या आपल्या क्षेत्रात आयोजित केले. चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी या सह्याद्री पर्वताच्या कुशीतील गावी हे १६ एकरचे क्षेत्र आहे. डोंगरदरीने वेढलेले, वृक्षराजीने सजलेले निसर्गरम्य असे हे क्षेत्र आहे.
या शिबिरात सामील होण्यासाठीच्या आवाहनात वयाची अट नव्हती. पुणे, मुंबई येथील अनेकांनी नावे नोंदविली. मात्र सुट्टीचा हंगाम असल्याने तसेच कोकणात येण्यासाठी रिझर्व्हेशन उपलब्ध न झाल्याने प्रत्यक्ष सहभाग मर्यादित झाला. अखेरीस प्रयोगभूमीतील मुले, शिक्षक, संस्थेचे कार्यकर्ते आणि पाहुणे मिळून ३० जण या शिबिरात सहभागी झाले.
रोज सकाळी ६.३० ते ९.३० असे तीन तास प्रत्यक्ष शेतातील काम आणि नंतरच्या वेळेत चर्चा, मांडणी, खेळ, नृत्य, हस्तकला, निसर्ग निरीक्षण असा भरगच्च कार्यक्रम ठरला होता. शेतातील कामात बांध-बंदिस्ती, पेरणी पूर्वीची नांगरणी, शेताची साफ-सफाई इ. कामांचा समावेश होता. गावात राहणाऱ्यांना या कामांचा सराव होता. शहरी मंडळींना मात्र अशा कामांचा सराव नसला तरीही, आवड आणि वातावरण निर्मितीमुळे तीही या कामात सामील होत रुळली देखील.

पहिल्या दिवशी सकाळचे शारीरिक श्रमाचे काम आटोपल्यावर दुपारच्या सत्रात हृषिकेश पाळंदे यांनी आपला प्रवास मांडताना श्रमाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. शहरात वाढल्याने मला सायकलिंगचे आकर्षण होते. मात्र गांधीजीनी मांडलेली उत्पादक श्रमाची संकल्पना वाचल्यावर मी सायकलिंगचे श्रम बंद केले.
आपल्याकडे श्रमाची वर्गवारी झालेली आहे. शहरात ही वर्गवारी अधिक गडद झालेली आहे. चार तास आय.टी.चे काम केल्यावर मला ५०० रुपये मिळायचे. इथे शेतात आठ तास काम केल्यावर मात्र ४०० रुपये मिळतात. याच कामासाठी स्त्रियांना केवळ २०० रुपये मिळतात.
श्रम विभागणीची ही उतरंड लोकांच्या डोक्यात पक्की बसलेली आहे. मात्र हे वास्तव समजणे, मांडणे आणि प्रत्यक्षात आणणे यात फरक आहे हे लक्षात आल्यावर मी खेड्यात राहून काम करण्याचा निर्णय घेतला असे यावेळी हृषिकेश यांनी मांडले.
पुढील सत्रात या शिबिरासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या ज्येष्ठ अभ्यासक आणि कार्यकर्त्या डॉ. लता प्रतिभा मधुकर यांनी श्रम विभागणी विषयी आपले विचार मांडले. आजची पिढी शारीरिक श्रमांकडे कसे पाहते हे समजून घेताना आमच्या पिढीने देखील श्रमाला मान्यता देण्याचा आग्रह धरला होता हे सुद्धा मांडावे लागेल.
अर्थात हा आग्रह प्रत्यक्षात फारसा अमलात नाही आणि आमच्या या प्रयत्नाविषयी नीट मांडणी देखील झालेली नाही. आमच्या पिढीने लिंगभाव आधारित श्रम व्यवस्था ठामपणे नाकारली.
आपल्याला श्रमावर आधारित ज्ञान संस्कृतीकडे डोळसपणे पाहायला हवे. शेतीकाम, कुंभारकाम, सुतारकाम इ. सर्व श्रम हे ज्ञानाधारित आहेत. त्यांचा उचित सन्मान व्हायला हवा. श्रमकारीगरी आणि बुद्धी यांचा मेळ साधायला हवा.
भविष्यात हे आपल्यासमोरील आव्हान आहे अशा शब्दांत डॉ. लता प्र.म. यांनी आपले विचार मांडले. पहिल्या दिवशीच्या थकव्यामुळे सर्वजण रात्री लवकर झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शेतातील कामाला सुरुवात झाली. शेतबांध दुरुस्त करणे हे काम कष्टाचे तर आहेच शिवाय त्यात कौशल्य देखील आहे.
कोणता दगड कुठे, कसा बसवावा हे कसब असते. हे काम नीट नाही केले तर बांध ढगरण्याचा धोका असतो. या कसबी कामात मंगेश मोहिते हे प्रयोग भूमीतील शिक्षक आणि त्यांच्या तालमीत तयार झालेला १४ वर्षांचा मंगेश हा विद्यार्थी या दोघांचा पुढाकार होता.
बाकीच्यांनी वाहतुकीची जबाबदारी पार पाडली. नांगरलेल्या शेतात रुजलेले गवत काढताना ते ‘बीम’ आहे एवढेच, तेही काही जणांना माहित होते.
मात्र त्याचे शास्त्रीय नाव ‘नागरमोथा’ असून त्याचे ‘मूळ’ सुगंधी तेल, उटणे यात वासासाठी वापरले जाते. हे समजल्यावर त्याचा सुगंध सर्वांच्या नाकात दरवळू लागला. यातूनच भाताच्या लागवडी बरोबरच ‘बीम’ची देखील लागवड करण्याची कल्पना पुढे आली.
पुढील सत्रात मल्हार इंदुलकर यांनी गावात राहून आपले भविष्य घडविण्याचा निर्धार व्यक्त करताना पर्यावरण संवर्धनाविषयीची आपली भूमिका मांडली. आजच्या उपभोगी व्यवस्थेतून पर्यावरणा बरोबरच सामान्य जनांचे शोषण ही नकळतपणे होत आहे हे त्यांनी विविध उदाहरणातून स्पष्ट केले. हे मांडताना त्यांनी ‘कार्बन फूट प्रिंट’ विषयी सजग होण्याचा आग्रह धरला. आपण सकाळी उठल्यापासून जे जे वापरतो, करतो त्याचा हिशोब करणे, नोंद ठेवणे गरजेचे आहे असे आग्रहाने मांडले.
पुढील एका सत्रात श्रमिक सहयोगचे अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी संगीतातील ताल, लय आणि स्वर याविषयीची माहिती गाण्यांचे मुखडे, हरकती घेत दिली. मग त्या त्या तालातील गाणी म्हणण्यात सारे जण नकळतपणे रमून गेले.
या सत्राची रंगत इतकी वाढली की, पुढील सत्रात श्रम आणि मनोरंजन या नात्याविषयीची चर्चा आकाराला आली आणि तितकीच रंगली देखील. खेळ, गाणी, नृत्य, गप्पा-गोष्टी हे सारे केवळ मनोरंजनाचे घटक नसून श्रम संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे असा निष्कर्ष या चर्चेतून पुढे आला.
चौथ्या दिवशी सकाळी शेतात काम केल्यानंतर मुंबई महानगर पालिकेतील शिक्षण प्रशिक्षक मानिनी पवार यांनी हस्तकला आणि नृत्यकला याविषयी सत्रे घेतली. कागदापासून विविध कलात्मक गोष्टी, पिशव्या बनविण्यात सारेजण गुंतून गेले. नृत्याच्या सत्रात त्यांनी सुरुवातीला नृत्यकले विषयी प्रारंभिक माहिती दिली. या माहितीनंतर त्यांनी नृत्याचा सराव घेतला.
या नृत्यात सर्वजण मोकळेपणाने सामील झाले. ही दोन्ही सत्रे संपूच नयेत अशी होती. एकंदर चार दिवस श्रमानुभवाचा हा आनंदोत्सव सर्वांगाने साजरा झाला. शेवटी झालेल्या समारोपाच्या सत्रात अशा शिबिरांचे प्रयोगभूमीत नियमित आयोजन व्हावे असे सर्वांनीच मांडले.
शारीरिक श्रमांकडे काहीसे नाईलाज आणि हीनतेने बघणाऱ्या समाजात श्रमाचे मूल्य रुजवू पाहणारा हा श्रमिक सहयोगचा प्रयास एका नव्या युगाची पायाभरणी ठरेल असा संकेत यातून निश्चितच मिळाला.