पश्चिम महाराष्ट्र

चार वर्षाची मुलगी झाली आई विना पोरकी

कोल्हापूर -शिवाजी विद्यापीठ रोडवर भरधाव ट्रकने धडक दिल्याने उजळाईवाडी (ता. करवीर) येथील दुचाकीस्वार महिला ठार झाली. दुचाकीवर मागे बसलेली महिला आणि चार वर्षांची बालिका सुदैवाने बचावली. शीतल सतीश कवडे (वय ३०, रा. दादू चौगुलेनगर) असे या दुर्घटनेत ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. वैजयंता अशोक पाटील (वय ४८) व ईशिता कवडे (४) अशी जखमींची नावे आहेत. राजाराम कॉलेज ते शिवाजी विद्यापीठ रोडवर रविवारी दुपारी साडेबारा वाजता ही दुर्घटना घडली. जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक बनलेल्या महिलेचा मृत्यू झाला. राजारामपुरी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, शीतल कवडे, त्यांची मुलगी ईशिता तसेच शेजारी राहणार्‍या वैजयंता पाटील संकष्टीनिमित्त सकाळी ओढ्यावरील गणपतीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून घरातून बाहेर पडल्या. टेंबे रोड येथील वैजयंता पाटील यांच्या बहिणीच्या घरी हे सर्वजण काही काळ थांबल्या. त्यानंतर ओढ्यावरील गणपती दर्शनासाठी ते बाहेर पडले.

देवदर्शनानंतर घरी जात असताना शिवाजी विद्यापीठ चौकातून पुढे पोस्ट कार्यालयासमोर भरधाव ट्रकने दुचाकीला मागील बाजूने जोरात धडक दिली. दुर्घटनेत शीतल ट्रकच्या चाकाखाली सापडल्या. वैजयंता व ईशिता रस्त्यावर दूरवर फेकल्या गेल्या. चाकाखाली सापडलेल्या शीतल यांना कंबरेला गंभीर इजा झाल्याने त्या जीवाच्या आकांताने तडफडत होत्या. शिवाय रक्तस्त्रावही झाल्याने त्यांची प्रकृतीही चिंताजनक बनली होती. कुटुंबीय, नातेवाईकांचा आक्रोश. जितेंद्र शिंदे यांनी जखमींना त्यांच्या रिक्षातून शासकीय रुग्णालयात हलविले. उपचार सुरू असतानाच शीतल कवडे यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीय, नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. डब्यातील खिचडी रस्त्यावरच विखुरलेली होती. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे, सहायक निरीक्षक भगवान शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment