सांगली – चांदोली परिसरातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तसेच चांदोली धरण दि. ३०, ३१ डिसेंबर ते १ जानेवारी असे तीन दिवस पर्यटकांसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती चांदोलीचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे व वारणा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता मिलिंद किटवाडकर यांनी दिली. सरत्या वर्षाला निरोप देताना तसेच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक पर्यटक चांदोली परिसरात येतात. त्यामध्ये काही अतिउत्साही पर्यटक दंगा, गोंगाट, जल्लोषामुळे चांदोली राष्ट्रीय उद्यानामधील वन्यजीव तसेच वन्यजीवांची आश्रयस्थळे यांना धोका पोहोचण्याची शक्यता असते. उद्यानातील वन्यजीवांचा धोका टाळण्यासाठी तसेच धरण परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे. सोमवार (दि. २) पासून धरण व अभयारण्य पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य परिसरातील पर्यटन स्थळे देखील ३१ डिसेंबर व एक जानेवारी या दोन दिवसाकरिता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्लाही पर्यटकांसाठी ३० डिसेंबर ते एक जानेवारी असे तीन दिवस बंद राहणार आहे. वेगवेगळ्या पर्यटन स्थळी येऊन मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच वन प्रशासनातर्फे हे निर्णय घेण्यात आले आहेत. दोन जानेवारीपासून पुन्हा एकदा बंद केलेली पर्यटन स्थळे खुली होतील असा खुलासा प्रशासनाने केला आहे