कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणांना पावसाळ्याच्या अगोदर नोटिसा दिलेल्या आहेत. या नोटिसांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. येथील अतिक्रमणांच्या संदर्भात सर्व कायदेशीर भाग पूर्ण करून महाशिवरात्रीच्या अगोदर विशाळगडावरील सर्व अतिक्रमण काढण्यात येईल, अशी माहिती कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत विशाळगडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात या बैठकीत गडावर कोंबड्या कापणे यांसारखे घडणारे अनुचित प्रकारही बंद करून गडावर पशूहत्या बंदी लागू करावी, अशी मागणी करण्यात आली. या बैठकीत विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने श्री. बाबासाहेब भोपळे, श्री. किशोर घाटगे, श्री. शिवानंद स्वामी यांनीही त्यांचे मत मांडले, तसेच या बैठकीसाठी कृती समितीचे सदस्य श्री. प्रमोद सामंत उपस्थित होते.
विशाळगडाच्या झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने गेल्या २ वर्षांपासून आंदोलन करण्यात येत आहे. या संदर्भात अतिक्रमणाचे सर्व पुरावे समितीने जिल्हाधिकारी यांना दिले होते. समितीच्या पाठपुराव्यामुळेच अतिक्रमणधारकांना नोटिसा काढल्या होत्या. समितीने दिलेल्या लढ्याचेच हे अंतिम फलित म्हणजे ही बैठक होती.
विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात सर्वांच्याच भावना या संतप्त होत्या. या बैठकीसाठी विशाळगडसाठी कार्य करणार्या विविध संघटना, कार्यकर्ते, पुणे येथील पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे, शिवदुर्ग आंदोलनाचे हर्षल सुर्वे, पत्रकार सुखदेव गिरी, इतिहास संशोधक श्री. इंद्रजित सावंत, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, विविध शासकीय अधिकारी, हिंदु एकता आंदोलनाचे दिलीप भिवटे, सेवाव्रत प्रतिष्ठानचे संभाजी साळुंखे यांसह अन्य अनेकजण उपस्थित होते.