क्रीडा

एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२

चायना पीआर संघाने गतविजेत्या जपानला हरवले

पुणे, दि. 4: चायना पीआर संघाने गुरुवारी एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ फुटबॉल स्पर्धेत सर्वात सनसनाटी निकालाची नोंद करताना गतविजेत्या जपानचे आव्हान नियोजित आणि अतिरिक्त वेळेतील बरोबरीनंतर पेनल्टी शूट आऊटमध्ये ४-३ गोलने संपुष्टात आणत अंतिम फेरीत प्रवेश केला.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर झालेला उपांत्य फेरीचा सामना कमालीचा रंगला. अतिरिक्त वेळेनंतरही सामना २-२ अशा बरोबरीत राहिला. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूट आऊटमध्ये चायना पीआर संघाने बाजी मारली. गोलरक्षक यु झु आणि कर्णधार वँग शानशान त्यांच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. चायना पीआर संघ आता नवव्या विजेतेपदापासून केवळ एक सामना दूर आहेत. जपान मात्र विजेतेपदाच्या हॅटट्रिकपासून वंचित राहिले.

जपानची सुरवात त्यांच्या लौकिकाप्रमाणे वेगवान झाली. त्यांनी पहिल्याच मिनिटाला हिनाटा मियाझावा हिने चायना पीआर संघाची गोलरक्षक यु झु हिच्या क्षमतेची कसोटी पाहण्यास सुरवात केली. मियाझावा हिच्या लांबवरून आलेल्या किकला अडवताना यु झु हिला आपले सर्वस्व पणाला लावावे लागले.

पाठोपाठ जपानच्या रिको युएकी हिला गोल करण्याची सुवर्ण संधी साधता आली नाही. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला तिची किक बाहेर गेली. जपान आणि युएकीचे धारदार आक्रमण हे सुरवातीच्या खेळाचे आकर्षण ठरले होते.

युएकीचा वेग कुठल्याही संघाच्या छातीत धडकी भरवणारा होता. जपानच्या रुका नोरीमात्सु हिने तिला सुरेख पास दिला. सहाव्या मिनिटाला मिळालेली ही संधीही वाया गेली. युएकीची किक गोलरक्षच यु झु हिने शिताफीने अडवली.

पहिल्या मिनिटापासून सुरु झालेला जपानाचा धडका पुढे वाढतच गेला. पयार्याने चायना पीआर संघावरील दडपण वाढत होते. युएकीचे आक्रमण कमी पजडले म्हणून जपानच्या साकी कुमागई आणि मना उवाबुची यांचेही सहा यार्डावरून गोल करण्याचे प्रयत्न फोल ठरले.

जपानला २१व्या मिनिटाला मिळालेली आणखी एक गोल करण्याची संधी गोलरक्षक यु झु हिने फोल ठरवली. हिनाटा मियाझावा हिच्या सुरेख पासवर पुन्हा एकदा युएकीने मारलेली किक यु झुने अडवली. या वेळी युएकीची दिशा योग्य होती, पण किकमध्ये तेवढा जोर नव्हता.

गोलपोस्ट जवळ असल्याने त्याने किक काहिशी कमी वेगाने मारली. पण, यु झु हिने ती अचूक अडवली.

जपानला अखेर २६व्या मिनिटाला चायना पीआरचा बचाव भेदण्याची संधी मिळाली. सामन्याच्या २६व्या मिनिटासला पुन्हा एकदा हिनाटाकडून आलेला पास या वेळी युएकीने अफलातून हेडर करत सार्थ ठरवला. या वेळी यु झु हिचे प्रयत्न फोल ठरले.

या गोल नंतर जपानच्या आक्रमणाला अधिकच धार आली. मध्यंतराला त्यांची आघाडी १-० अशी मर्यादित राहिली असली, तरी विश्रांतीपूर्वीच्या अखेरच्या मिनाटाला हिनाटाची जबरदस्त किक गोलपोस्टच्या अगदी जवळून बाहेर गेली.

गोल करण्याच्या संधी हुकल्यांची सल जपानला नक्कीच लागून राहिल. दुसऱ्या सत्राला सुरवात होत नाही, तो झिआओ युई हिने हिलेल्या सुरेख पासवर वु चेंगशू हिने गोल करून चायना पीआर संघाला बरोबरी साधून दिली. यानंतरही जपानचा धडाका काही थांबला नव्हता.

तरी त्यांना आघाडी वाढवण्यात अपयश आले. हिनाटाचा आणखी एक प्रयत्न फोल ठरला. अपयशाने त्यांची पाठ सामन्याच्या अखेरच्या मिनिटापर्यंत सोडली नाही. सामन्याच्या ७५व्या मिनिटासला युएकीची किक बाहेर गेली. सामन्याच्या भरपाई वेळेतही युएकीचे प्रयत्न फोल ठरले.

गोल करण्याच्या या अथक प्रयत्नांना जपानला १०३व्या मिनिटाला यश आले. युएकीनेच हा गोल करताना हासेगावा हिच्या फ्री-किकवर सुरेख गोल करून जपानला आघाडीवर नेले.

सामना येथेच संपला नाही. जपानच्या अथक प्रयत्नांना आज नशिबाची साथ नव्हती. युएकीचा हेडर द्वारे गोल करण्याचा आणखी एक प्रयत्न चायनान पीआरची गोलरक्षक यु झु हिने फोल ठरवला. सततच्या या अपयशाने जपानला निराश केले आणि परिणामी ११९व्या मिनिटाला त्यांना गोल स्विकारावा लागला.

चायना पीआरची कर्णधार वँग शानशान हिने झँग शिन हिचा पास सत्कारणी लावताना सुरेख गोल करत सामना टायब्रेकमध्ये नेला. संपूर्ण सामन्यात जपानच्या युएकी आणि हिनाटा यांच्या मध्ये चीनच्या भक्कम भिंतीप्रमाणे उभी राहिलेली गोलरक्षक यु झु हिने पेनल्टीमध्ये पहिली आणि पाचवी पेनल्टी अडवून चायना पीआर संघाला अंतिम फेरीत नेले. यापूर्वी आठवेळा विजेते असणाऱ्या चायना पीआर संघ २००८ नंतर प्रथमच अंतिम फेरीत पोचला आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment