कमलेश गायकवाड
नवी दिल्ली ता १९ – चीनने गेल्या ६० वर्षापासून भारताच्या भूभागावर अनधिकृत कब्जा केला आहे. त्या भारतीय भूभागावर चीन आता गलवान भागातील प्यान्गसोंग तलावाच्यावरून एका पुलाचे बांधकाम करत आहे. या पुलाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात की काय अशी भीती वाटत आहे असे कांग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज म्हटले.
भारत आणि चीन यांच्यात मध्ये – मध्ये तणावाचे वातावरण असते. हा तणाव वाढत जात आहे. भारत आणि चीन मध्ये अद्याप सरहद्दीची कायमस्वरूपी आखणी झालेली नाही .
उभय देशात वास्तविक सरहद्द रेषा आहे . दोन्ही देश सरहद्द वाद सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अधून – मधून वार्तालाप होत असतो. चीनच्या कुरापतीवर राहुल गांधी वेळोवेळी आपले मत व्यक्त करत असतात.
आज त्यांनी एक ट्विट केले आहे . त्यात लडाख भागात चीन बांधकाम करत असलेल्या पुलाचा उल्लेख केला आहे . चीन बांधकाम करत असलेल्या पुलाचे फोटो उपग्रहाच्या मदतीने घेण्यात आले आहेत.एकंदर ३१५ मीटर लांबीचा हा पूल आहे . सामरिक दृष्टीने ( सैनिकांची हालचाल ,तैनाती) हा पूल महत्वाचा आहे.
चीनला वास्तविक रेषेच्या जवळ सैन्य पाठवण्यासाठी या पुलाची खूप मदत होणार आहे . भारतासाठी हा पूल एक आव्हान असेल असे राहुल गांधी संकेतात म्हणतात.चीनने आमच्या भूभागावर मागच्या ६० वर्षापासून बळजबरीने कब्जा केलेला आहे . त्या भागात या पुलाचे बांधकाम होत आहे .
हे आम्हाला( भारताला) मान्य नाही असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.या पुलाचे बांधकाम सप्टेंबर २०२१ पासून सुरू झालेले आहे . आता या पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे .
” आमच्या देशात चीन एका सामरिक दृष्टीने महत्वाच्या पुलाचे बांधकाम करत आहे. पंतप्रधानांनी ( नरेंद्र मोदी) मौन धारण केल्याने पी. एल .ए .चे ( चीनच्या सैन्याचे नाव) मनोबळ वाढत जात आहे. पंतप्रधान या पुलाचे उदघाटन करण्यास जातील की काय अशी भीती वाटत आहे.” हे ट्विट राहुल गांधी यांनी आज केले आहे.