सातारा – जेली चॉकलेट घशात अडकल्याने दीड वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सातार्यात कर्मवीरनगरमध्ये घडली. खेळता खेळता चिमुकलीला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या घटनेने शहर परिसर हेलावला आहे.
शर्वरी सुधीर जाधव (रा. कर्मवीरनगर, कोडोली, सातारा) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी, कर्मवीरनगरमध्ये सुधीर जाधव यांचे घर असून ते मूळचे दुशेरे (ता. कराड) येथील आहेत. त्यांची शर्वरी ही चिमुकली रविवारी लहानग्यांसोबत खेळत होती. यावेळी तिच्या मैत्रिणीने शर्वरीला खाण्यासाठी जेली चॉकलेट दिले.
शर्वरी ते चॉकलेट खाऊ लागली. खाता-खाता चॉकलेट तिच्या घशात अडकले. त्यामुळे ती मोठ्याने खोकू लागली. काही क्षणातच ती बेशुद्ध पडली. हा प्रकार शर्वरीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घराशेजारी राहणारे जाधव यांना बोलावून घेतले. त्यांनी तातडीने शर्वरीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दवाखान्यात आणल्याने शर्वरीला काही होणार नाही, असे तिच्या आईला वाटले. प्रत्यक्षात डॉक्टरांनी तिला तपासले असता ती मृत झाल्याचे समोर आले. हे समजताच कुटुंबिय हादरुन गेले. आईने केलेला आक्रोश तर काळीज पिळवटून टाकणारा होता. या घटनेने सातार्यात हळहळ व्यक्त होत आहे.