धुळे – चाळीसगाव महामार्गावर पुढे अचानक थांबलेल्या कंटेनरला मागून आलेल्या बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात नऊ ते दहा जखमी झाले असून चालक आणि एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे जखमींना तात्काळ उपचारार्थ धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धुळे चाळीसगाव महामार्गावर आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास बस आणि कंटेनर यांचा अपघात होऊन नऊ ते दहा जण जखमी झाले आहेत. महामार्गावर असलेल्या रेल्वे स्टेशनचे फाटक बंद असल्याने तर्डी फाट्याजवळ पुढे चालणाऱ्या कंटेनर ने अचानक ब्रेक दाबला याचवेळी मागून आलेल्या औरंगाबाद ते शिंदखेडा MH १४ BT १८५४ क्रमांकाच्या बस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने कंटेनरला मागून जबर धडक दिली, यावेळी बस मध्ये बसलेल्यान ४२ प्रवासीपैकी नऊ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले असून चालक महेंद्र पाटील वय ३५ आणि एक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारार्थ धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी याच महामार्गावर एक अपघात होऊन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली होती, गेल्या अनेक वर्षांपासून धुळे चाळीसगाव महामार्गाची दुरावस्था झाली असून वारंवार होणाऱ्या अपघाताच्या घटना लक्षात घेता या महामार्गाच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. गरताड आणि पिंपरी ही दोन गावे या महामार्गावर असून अपघाताच्या वारंवार घडणाऱ्या घटना पाहता महामार्गावर गतिरोधक बसण्याची आणि रस्ता दुरुस्तीची देखील मागणी नागरिकांकडून केली जात आहे.