राज्यात दिवसभरात ३ हजार ८९८ नवीन करोनाबाधित आढळले असून, ३ हजार ३ हजार ५८१ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय आज राज्यात ८६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. अजुनही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६३,०४,३३६ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०८ टक्के एवढे झाले आहे.
राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४,९३,६९८ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३७८९७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,५१,५९,३६४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,९३,६९८ (११.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,०६,५२४ व्यक्ती गृह विलगिकरणात आहेत. तर २ हजार २१ व्यक्ती संस्थात्मक विलगिककरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४७,९२६ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आगामी सण उत्सवाच्या काळात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
सध्या निर्बंध वाढविण्याबाबत आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री यांचा कोणताही विचार नसून संपूर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. संख्या कुठे वाढते आहे? का वाढते आहे, यावर विशेष लक्ष आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले. नागपूरच्याबाबतीत तेथील आकडे आणि परिस्थिती पाहून मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.