अनुराधा कदम, कोल्हापूर
करोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी आदेश मोडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील विजयाची मिरवणूक काढल्याबद्दल राज्यमंत्र्यांसह तिन्ही विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक मतमोजणी पार पडल्यानंतर अनेक ठिकाणी जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केला असतानाही मोठा शेकडो लोकांचा जमाव जमून जेसीबी मधून गुलालाची उधळण करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल लागल्यानंतर मिरवणूक काढण्यात येऊ नये. अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी दिला होता. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार सदरचे गुन्हे स्थानिक पोलिसांकडून उमेदवार व कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला.
जयसिंगपूर येथे मिरवणूक काढल्याबद्दल आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, बंधू संजय पाटील यांच्यासह ४०० कार्यकर्त्यांवर, शाहुवाडी येथे माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड यांचे नातू रणवीर गायकवाड, संतोष पाटील, रोहित कांबळे यांच्यासह ६० जणांविरुद्ध तर वडगाव येथे विजयी उमेदवार विजयसिंह अशोक मानेसह अन्य कार्यकर्त्यांविरोधात बेकायदेशीर मिरवणूक काढल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे रविवारी स्थानिक पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले