सातारा – स्वप्नांचा पाठलाग करत असताना कष्ट, योग्य नियोजन अन् जिद्द असली की ही स्वप्न पूर्ण होतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर अनेकांनी आपल्या स्वप्नांना पूर्णत्वास उतरवलंय. साताऱ्याच्या ओंकार पवारने असंच जोरदार यश मिळवलंय, जे स्वप्नांच्याही पलिकडे जाणारं आहे. महाराष्ट्र कॅडर मिळालेल्या ओंकार पवार यांचा आयएएस होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणाराच आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ओंकार यांनी दोनदा यूपीएससी (UPSC) परीक्षा पास केलीय. आधी IPS झाले अन् नंतर आता IAS.
ओंकार सांगतात, मी जेंव्हा स्पर्धा परीक्षा करायचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या आईला का कुणास ठाऊक पण मी BDO(गट विकास अधिकारी) व्हावं असं वाटतं होतं. तिला त्यांचं काम काय असते याची पण काही कल्पना नव्हती. त्याचं झालं असं होतं की 1994 साली आमच्या घरच्यांनी दुसऱ्याचे शेत करायला घेतले होते. तो व्यक्ती BDO होता. तिने बघितलेले ते सर्वात उच्च सरकारी अधिकारी होते. त्या काळात त्यांचा रुबाब बघून सगळेच हरखून जायचे. माझी आई पण त्याला अपवाद नव्हती. ग्रामीण भागात लोकांना सरकारी नोकरी म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. म्हणून मग ज्या दिवशी माझा IAS चा निकाल लागला, तेव्हा मी आईला हेच सांगितले की हे BDO सारखंच काम असतं, असं ओंकार यांनी सांगितलं.
दुसरा एक किस्सा सांगताना ओंकार म्हणतात, आमची बागायती शेती आहे. मग बऱ्याच वेळा आई भाजीपाला घेऊन पाचगणीच्या बाजारामध्ये विक्रीसाठी जायची. कोणत्याही बाजाराची एक सिस्टम असते. त्यात विक्रेत्यांच्या जागा फिक्स असतात. पण माझी आई कधीतरी बाजाराला जायची त्यामुळे जागेवरून खूप वाद व्हायचे. वरुन पाचगणी नगरपरिषदवाले पण जागेवरून खूप त्रास द्यायचे. जेव्हा मी upsc चा अभ्यास चालू केला तेव्हा तिने विचार करून ठेवलेला की मी पास झालो की तिला माझ्या सरकारी पदाच्या जोरावर एक फिक्स जागा मिळवून देईल. आणि मग तिच्याशी वाद घालायची कुणाची हिम्मत होणार नाही, असंही ओंकार सांगतात.
माझी आजी आज 81 वर्षाची आहे. तिने शाळेची पायरी पण चढली नाही. आजीचा मी सगळ्यात लाडका आहे. तिला असे कायम वाटत की मी तिच्या जवळच राहावं. मी दूर गेलो की तिला टेन्शन येतं. आमचे बऱ्यापैकी नातेवाईक मुंबईमध्ये असल्यामुळे मुंबई तिला सुरक्षित वाटायची म्हणून जेव्हा जेव्हा मी upsc इंटरव्ह्यूला जायचो तेव्हा तिला हे सांगून जायचो की दिल्ली जास्त लांब नाहीय, जस्ट मुंबईच्या पुढे आहे. त्यामुळे मी लांब जातच नाहीय. पास झाल्यावर पण हेच सांगितले की कामाचं ठिकाण हे मुंबईच आहे. तिच्या पुण्याईने असेल कदाचित की मला महाराष्ट्र कॅडरच मिळालं.