खांदेश्वर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल व उरण तालुका महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी असणार्या अदिती सोनार यांच्यावर खांदेश्वर पोलीस ठाण्यात पनवेल तहसील कार्यालयातर्फे फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आदिती सोनार यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सहीचा आणि शिक्क्यांचा वापर करून अवैध्य बांधकाम केल्याचा आरोप होत आहे. याबाबत तक्रार दाखल होताच, खांदेंश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मिळालेल्या माहितीनुसार, आदिती सोनार यांनी काही दिवसांपूर्वी पनवेलच्या विहिघर परिसरातील शेतजमिनीवर बांधकाम केलं होते. यासाठी त्यांनी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सहीचा आणि शिक्यांचा वापर केला होता. तसेच याशिवाय त्यांनी शेतजमीन बिनशेत असल्याचे देखील भासवलं होते.
यासंदर्भात रायगड जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार प्राप्त झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी केली असता, आदिती गोरे यांनी बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर केल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी रायगडच्या खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण उघड होताच परिसरात खळबळ उडाली आहे. अदिती सोनार यांनी वर्षभरापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश केला होता.