पश्चिम महाराष्ट्र

महावितरण मध्ये माणुसकीचा अंधारच

दरीबडची : सांगली जिल्ह्यातील तिकोंडी (ता. जत) येथील महावितरणचे बाह्यस्रोत कर्मचारी महंमद हुसेन मुजावर हे दहा वर्षांपूर्वी डी. ओ. जंप जोडताना विजेच्या तीव्र झटक्याने गंभीर जखमी झाले होते. उजवा हात व एक मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांच्या आयुष्यात अंधार पसरला. माणुसकीचा पुरवठा खंडित करून महावितरणने त्यांच्यासाठी मदतीचा कोणताही प्रकाश न दिल्याने विजेच्या धक्क्यापेक्षाही जास्त वेदना त्यांना आता सहन कराव्या लागत आहेत.

पूर्व भागातील संख येथे ३३ केव्ही विद्युत मंडळ कार्यालय आहे. महंमद मुजावर यांनी कोल्हापूर येथील शासकीय विद्यानिकेतनमध्ये इलेक्ट्रिकलची पदवी घेतली होती. ते तिकोंडी उपकेंद्राअंतर्गत विद्युत अप्रेंटीस सोसायटीमार्फत बाह्यस्रोत कर्मचारी म्हणून २०१० पासून कार्यरत होते. १६ फेब्रुवारी २०१३ रोजी लाइनमन भडंगे यांच्यासोबत डी. ओ जंप जोडण्यास ते गेले होते. त्यांनी फिडरवर रीतसर परवानगी घेतली होती.

ते विद्युत खांबावर चढले. विद्युत पुरवठा बंद न केल्यामुळे त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला. ते खांबावरून खाली पडले. या दुर्घटनेत त्यांचा उजवा हात पूर्णपणे व उजवी किडनी निकामी झाली आहे. निकामी मूत्रपिंड काढण्यात आले. या घटनेची तक्रार उमदी पोलिस स्टेशन व कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली नसल्याची माहिती मिळाली. दवाखान्याचा खर्च कंपनीकडून मिळाला नाही. तीन लाखांचे कर्ज काढून बिल भागविण्यात आले. त्यांना पत्नी, दोन मुले, मुलगी आहे. मुलगा लालसाब ऊसतोडणी मजूर म्हणून काम करतो. दुसरा मुलगा दावलमलिक विजयपूर येथे रोजंदारीवर मजूर म्हणून काम करतो.

महंमद मुजावर यांना कायमचे अपंगत्व आल्याने कोणतेही काम त्यांना करता येत नाही. सध्या त्यांना महिन्याला रक्त द्यावे लागते. दवाखान्यासाठी दरमहा आठ हजार रुपये खर्च येतो. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांची पत्नी बेगम्मा मुजावर मोलजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. मुलांना नोकरीची अपेक्षा मुजावर यांनी महावितरणकडे त्यांच्या मुलांना अनुकंपाची नोकरी मिळावी, यासाठी वारंवार पाठपुरावा केला; पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment