सिंधुदुर्ग – नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर परसलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीचा २०२३ चा वार्षिकोत्सव शनिवार ४ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. देवीचा कौल घेऊन देवीच्या यात्रेची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशा-परदेशात कोकणातील ज्या एका जत्रेचं आकर्षण आहे ती म्हणजे आंगणेवाडीची जत्रा. दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात या देवीची जत्रा रंगते. यंदादेखील तसेच मालवण आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला येणार्यांचे मोठ्या उत्सहाने स्वागत करत आहे. अवघ्या दीड दिवसाच्या या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक भाविक उत्सुक असतात. मग यात सामान्य नागरिकांपासून अनेक प्रथितयश कलाकार आणि राजकारणी मंडळी हमखास भेट देतात.
आंगणेवाडी जत्रेची ही आहेत वैशिष्टये
मालवण तालुक्यातील आंगणे वाडी हे लहानसे गाव आहे. या गावात ‘भराडीदेवी’ विराजमान आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव ‘भराडी देवी’ असं ठेवण्यात आलं आहे. भराड म्हणजे माळरान.
आंगणेवाडी या गावातील केवळ आंगणे कुटुंबीयांची ही देवी आहे. मात्र नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने ग्रामस्थांसोबत सामान्य नागरिकांना तिचे दर्शन खुले असते.
आंगणेवाडीतील भराडीदेवीचं मंदिर हे खासगी मंदिर आहे. मात्र भाविकांच्या गर्दी आणि श्रद्धेसाठी ते इतर सर्व भाविकांना खुले असते. गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचं दर्शन घेतात.
दरवर्षी सुमारे 15-16 लाख भाविक भराडीदेवीच्या दर्शनासाठी केवळ दीड दिवसांच्या जत्रेमध्ये सहभागी होतात. यामध्ये सामान्य नागरिक, आंगणे ग्रामस्थ एकत्र पूजा करतात.
दीड दिवसाच्या या जत्रेमध्ये पहिला दिवस हा पाहुण्यांसाठी असतो तर दुसरा दिवस हा आंगणे ग्रामस्थांसाठी असतो. प्रामुख्याने आंगणे गावातील माहेरवाशिणी एकत्र येऊन पूजा करतात, महाप्रसाद करतात.
आंगणेवाडीच्या भराडीदेवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून करतात. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो. साऱ्यांसाठी केवळ या आंगणेवाडीच्या महिला प्रसाद बनवतात.
धार्मिक महत्त्वासोबतच आंगणेवाडीच्या भराडीदेवी यात्रेमध्ये सांस्कृतिक सोहळा देखील रंगतो. आंगणे ग्रामस्थ एक नाटक करतात त्याला मांडावरचं नाटक म्हणतात. मिरजेहून गोंधळी येतात ते देवीसमोर गोंधळ मांडतात. दशावतार असतो.
अनेक राजकारणी मंडळी भराडीदेवीच्या दर्शनाला येतात.
कसे जाल?
कणकवली स्टेशनपासून कणकवली डेपोपर्यंत जाण्यासाठी शेअर रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे. कणकवली बस डेपोतून आंगणेवाडीला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाने बसेस असतात. आंगणेवाडीपर्यंत एसटीच्या तिकीटाचा दर अगदी माफक ठेवण्यात येतो.
जर तुम्ही स्वतःच्या वाहनाने प्रवास करणार असाल तर पुणे-कोल्हापूर मार्गे तुम्ही कणकवलीपर्यंत जावू शकता आणि त्यानंतर आंगणेवाडीपर्यंतचा पुढचा प्रवास करता येईल. पुणे-कोल्हापूर मार्गाव्यतिरिक्त तुम्ही मुंबई-गोवा महामार्गाचाही वापर करु शकता