कसारा जंगलात एका २१ ते २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणीच्या मृतदेहावर चाकुने वार केल्याच्या जखमा आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तरुणीचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी कसारा जंगलात एका प्रवाशाला आढळल्यानंतर त्याने याबाबतची माहिती कसारा पोलिसांना दिली. त्यावरुन पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कसारा नजीकच्या वारली करंजपाडा गावातील जंगलात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला तरुणीचा मृतदेह एका प्रवाशाच्या नजरेस पडला होता. त्यानंतर त्याच प्रवाशाने मृतदेहाविषयी माहिती कसारा पोलिसांना दिली. माहिती मिळताच गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत तरुणीचा मृतदेह शहापूरमधील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला.दरम्यान पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. मात्र ही तरुणी कोठून आली, तिची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात रस्त्याच्या कडेला असलेल्या निर्जनस्थळी फेकून देण्यामागचा हेतू काय आहे. याचा तपास पोलिसांकडून अद्याप सुरु आहे. लवकरच आरोपीला पकडण्यात येईल त्यानंतरच या गुन्ह्याची संपर्ण माहिती देणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून देण्यात आली.