सांगली – जिल्ह्यातील इस्लामपूर येथील पोलीस उपअधीक्षक पद गेल्या ५ महिन्यांपासून रिक्त आहे. सध्या प्रभारी अधिकार्यांच्याकडे या पदाचा कार्यभार असून ५ महिन्यांत ५ अधिकार्यांच्याकडे कार्यभार देण्यात आला आहे. नव्या अधिकार्यांची नेमणूक कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जुलै महिन्यात तत्कालीन पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच सध्या सांगली शहरचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्याकडे हा पदभार देण्यात आला आहे.
यापूर्वी तासगावच्या पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेडगे, मिरजचे उपअधीक्षक अशोक वीरकर त्यानंतर अजित टिके व विट्याच्या पद्मा कदम यांच्याकडे हा पदभार होता. गेल्या ८ दिवसांपासून पुन्हा अजित टिके हे इस्लामपूरचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यभार पहात आहेत. इस्लामपूर पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वाळवा तालुक्यातील इस्लामपूर, आष्टा, कासेगाव, कुरळप व शिराळा तालुक्यातील शिराळा, कोकरूड अशी ६ पोलिस ठाणे येतात. दोन्ही तालुके राजकीय व गुन्हेगारीच्यादृष्टीने संवेदनशीलच आहेत.
येथील क्राईम रेटही सातत्याने वाढलेला असतो. त्यामुळे येथे कायमस्वरूपी अधिकार्याची नियुक्ती होणे गरजेचे आहे. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी मोका कायद्याचा वापर करत येथील गुन्हेगारी टोळ्यांचा चांगलाच बंदोबस्त केला आहे. ही गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढण्याआधी येथे सक्षम पोलिस उपअधीक्षकांची नेमणूक होणे गरजेचे आहे.