मुंबई

प्रेम संबंधातून विवाहित प्रेयसीची निर्घृण हत्या

डोंबिवली – प्रेम संबंधातून झालेल्या वादावादीत प्रेयसीचा खून केल्याची घटना डोंबिवलीतील मानपाडा परिसरात घडली. दरम्यान आरोपीने स्वतःच पोलीस ठाणे गाठत आपण खून केल्याची कबुली मानपाडा पोलीस ठाण्यात दिली. यासंदर्भात आरोपीवर मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक चौकशी सुरू केली आहे.

मानपाडा रस्त्यावरील पाईप लाईन परिसरात राहणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेचे तिच्या शेजारी राहणारे संदीप आहिरे यांच्या सोबत प्रेम संबंध होते. याच प्रेम संबंधांमधून मृत महिला आणि आरोपी संदीप यांची बाचाबाची होत असे. मात्र बुधवार सकाळी ११ वाजताच्या दरम्यान यांच्यामध्ये जोरजोरात वाद झाले. त्यानंतर आरोपी संदीप याचा संतापावरचा ताबा सुटला आणि त्याने मृत महिलेच्या गळ्यावर चाकूने वार केले. दरम्यान या महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पश्चाताप झालेला आरोपी संदीप याने स्वतः मानपाडा पोलीस ठाणे गाठत आपण शेजारी राहणाऱ्या महिलेचा खून केल्याची कबुली दिली. आरोपी संदीप याचे लग्न झाले नसून महिला मात्र विवाहित आहे. या महिलेचा पती खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली. कल्याण पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment