माजी पालकमंत्र्यांनी चार महिन्यांपूर्वी केले होते रस्त्याचे भूमिपूजन
भाविकांचा संताप अनावर, प्रा.मोरेश्वर इंगळे यांचा आंदोलनाचा इशारा
नांदगाव पेठ/प्रतिनिधी
संगमेश्वर देवस्थान येथे दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना चिखलातून मार्ग काढावा लागत असल्याने भाविकांचा संताप अनावर होतो आहे. सध्या श्रावणमास असल्याने भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली आहे मात्र कोट्यवधींचा तीर्थक्षेत्रविकास निधी खर्चूनही रस्त्याची मात्र दुरावस्था झालेली आहे. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वी माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी संगमेश्वर रस्त्याच्या १ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन देखील केले होते मात्र अजूनही रस्ता जैसे थे असून भाविकांना मात्र मनःस्तापाला सामोरे जावे लागत आहे.याबाबत युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस प्रा.मोरेश्वर इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन सादर केले असून त्वरित रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तिर्थक्षेत्राचा 'क' दर्जा प्राप्त असलेले संगमेश्वर मंदिर विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.श्रावणमासात याठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी असते.दूरवरून भाविकगण याठिकाणी दर्शनासाठी येतात.नागपूर महामार्गापासून मंदिराकडे एक रस्ता आहे तर दुसरा मार्ग नांदगांव पेठ गावातून जातो मात्र दोन्ही रस्ते चिखलमय असून पायी जाणाऱ्याला तर कसरत करावी लागत आहे शिवाय वाहनधारकांना सुद्धा या मार्गावरून वाहन काढणे कठीण झाले आहे. अनेक भविकभक्त या चिखलमय रस्त्यावरून मार्ग काढतांना घसरून पडल्याच्या देखील घटना घडल्या आहेत.तरी देखील प्रशासनाने कोणतीच व्यवस्था याठिकाणी केलेली नाही.
रस्त्यासाठी कोट्यवधीरुपये मंजूर असून देखील हेतुपुरस्सर धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम करण्यात येत नसल्याचा आरोप प्रा. मोरेश्वर इंगळे यांनी केला असून काम करण्यास असमर्थ असलेल्या कंत्राटदारांकडून हे काम काढून घ्यावे आणि दुसऱ्या गरजू कंत्राटदाराकडून रस्त्याचे बांधकाम करावे व भाविकांना दिलासा द्यावा अशी मागणी युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस प्रा. मोरेश्वर इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केलेली आहे. श्रावणमासात भाविकांना होणारा त्रास आणि मनःस्ताप प्रशासनाने थांबवावा आणि पर्यायी व्यवस्था करून द्यावी अन्यथा याविरोधात आपण आंदोलन करू असा निर्वाणीचा इशारा प्रा. मोरेश्वर इंगळे यांनी दिला आहे.