सिंधुदुर्ग- छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुद्द्यावरून आमदार नितेश राणे हे आता अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशा आशयाचे स्टिकर तयार केले आहेत. या स्टिकर चा व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर प्रसिद्ध केला आहे. अजित पवार यांनी पुणे येथे स्वराज्य रक्षक संभाजी असे स्टिकर गाड्यांवर लावले होते त्याला उत्तर देण्यासाठी नितेश राणे यांनी हा स्टिकर प्रसिद्ध केला आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सभागृहात केलेल्या विधानावरुन राजकारण तापलं आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्यांची मागणी भाजप नेते, हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.”छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे,” अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडली आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बाल शौर्य पुरस्कार देण्याची मागणी करताना अजित पवार यांनी हे विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत.
धरण वीर म्हणत आमदार नितेश राणे यांची अजित पवारांवर टीका
आम्ही हिंदवी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणारच असं नितेश राणे म्हणाले. नितेश राणे यांनी अजित पवार यांच्यासाठी धरणवीर असा शब्द वापरला. धरणवीर असणाऱ्यांना धर्मवीर ही पदवी कधीच कळणार नाही, अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या मंडळींना सांगतो, असं नितेश राणे म्हणाले. धर्मवीरांना समजणे हे राष्ट्रवादीला आणि पवारांना कधीच जमणार नाही असं म्हणत त्यांनी अजित पवार यांना नितेश राणे यांनी सणसणीत टोला लगावला. अजित पवार यांच्याकडे थोडीपण लाज राहिली असेल तर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षपदावर जो ठप्पा लागला आहे तो त्यांनी राजीनामा देऊन पुसावा, अशा आशयाचं ट्वीट आमदार नितेश राणे यांनी केले.
अजित पवार टिल्लू म्हणाले
यानंतर अजित पवार यांनी टिल्लू म्हणत आमदार नितेश राणे यांचे किल्ले उडवली. अशा लोकांना मी उत्तर देत नाही त्याला माझे प्रवक्ते उत्तर देतील अशा शब्दात अजित पवार यांनी नितेश राणे यांचा समाचार घेतला.
नितेश राणे यांनी जाहीर केला स्टिकर
दरम्यान भाजप आमदार नितेश राणे हे धर्मवीर मुद्द्यावर आणखीन आक्रमक झाले आहेत. आम्ही पण तयार आहोत… धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय !!! असे ट्विटमध्ये म्हणत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे लिहिलेला आणि संभाजी महाराजांचा फोटो असलेला स्टिकरचा व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर शेअर केला आहे.