धुळे – चिकाटी जिद्द योग्य नियोजन आणि कष्टतून स्वप्नाला मूर्त स्वरूपात उतरवण्याची किमया साधलेले धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील शेतकरी कैलास रोकडे यांनी ऍपल बोरांची शेती फुलवली आहे. त्यांच्या ऍपल बोरांना दिल्ली, कोलकाता, नेपाल ह्या बाजारपेठ मिळाली असून त्यातून भरघोस उत्पन्नातून त्यांनी आपल्या उन्नतीचा नवीन मार्ग शोधला आहे.
धुळे जिल्ह्यातील बहुतांश भाग हा कोरडवाहू जमिनींचा असून या जमिनीला फक्त पावसाळ्यातच पाणी मिळतं, अशा स्थितीत ठिबक सिंचनाच्या माध्यमातून धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील शेतकरी कैलास रोकडे यांनी फळबागेची शेती करत ऍपल बोरांचे उत्पादन घेतले आहे. या ऍपल बोरांनी कोलकत्ता आणि दिल्लीची बाजारपेठ काबीज केली असून यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे.
फळबाग शेतीचे योग्य नियोजन वेळोवेळी निगा खत फवारणीसह छाटणी केल्यावर आठ ते नऊ महिन्यात यातून चांगली फळे येण्यास सुरुवात होते. पहिल्या वर्षी प्रत्येक झाडानुसार किमान ३० ते ५० किलो तर दुसऱ्या वर्षी प्रत्येक झाडाला ८० ते १२० किलो बोरांचे उत्पादन होते. देशी बोरापेक्षा ऍपल बोरांचे वजन हे सरासरी ६० ते २००g पर्यंत भरते विशेष म्हणजे एप्पल बोरांचे एक झाड सुमारे २० वर्षे जगते या ऍपल बोरांना स्थानिक बाजारपेठेत प्रति किलो सरासरी १५ ते १६ रुपयांपर्यंत तर गेल्या वर्षी दिल्ली बाजारपेठेत हा दर सरासरी २० ते ३० रुपये होता. या ऍपल बोरांच्या उत्पादनातून कैलास रोकडे यांनी तालुक्यातील इतर शेतकऱ्यां समोर चांगला आदर्श निर्माण केला आहे.
कडधान्य आणि इतर पिकांचा खर्च जास्त असल्याने त्यातून उत्पन्न कमी आणि श्रम जास्त असल्यामुळे फळबाग लागवडीतून भरघोस उत्पन्न घेता येऊ शकते, असं कैलास रोकडे सांगतात. कैलास रोकडे यांनी ऍपल बोरांच्या शेतीतून १४ ते १५ लाखांचे तर दोन एकरात आवळा झाडांच्या लागवडीतून सरासरी अडीच ते तीन लाखांपर्यंत उत्पन्न घेतले आहे. तसेच त्यांनी नव्याने गोल्डन व्हरायटी सीताफळाची लागवड केली असून त्यातून एक ते दीड लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार असल्याचा विश्वास त्यांना आहे.