कोंकण

खोटले धनगरवाडी सड्यावर ३५हून अधिक कातळशिल्पांचा शोध

‘लज्जागौरी’सदृश शिल्पाचे अस्तित्व: हा प्राचीन वारसा चिरेखाणींच्या विळख्यात : सतीश लळीत


विवेक ताम्हणकर, कोंकण 


सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर घालणारी आणखी ३५हून अधिक कातळशिल्पे उजेडात आली आहेत. कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील खोटले (ता. मालवण) गावच्या धनगरवाडी सड्यावर आढळलेल्या या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे येथे आढळलेले ‘लज्जागौरी’सदृश कातळशिल्प आश्चर्यकारक असून आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे, अशी शक्यता आहे.

मात्र या सर्व कातळशिल्पांचे अस्तित्व या परिसरातील चिरेखाणींमुळे धोक्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून अनेक कातळशिल्पे चिरेखाणींमध्ये नष्टही झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती या कातळशिल्पांचा शोध लावणारे अभ्यासक व ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिली.

आपल्या या नव्या शोधाबाबत माहिती देताना श्री. लळीत म्हणाले की, मी गेली २१ वर्षे जिल्ह्यातील कातळशिल्पांचे संशोधन व अभ्यास करीत आहे. अलिकडेच माझे ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. नवीन कातळशिल्पे शोधण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु असताना खोटले येथील माळरानावर ‘वेताळा’चे चित्र कोरलेले आहे, अशी माहिती मिळाल्यावर मी व डॉ. सौ. सई लळीत अशा दोघांनी या परिसरात मोहिम आखली.

या परिसरात राहणारे श्री. लक्ष्मण बाबु जंगले यांच्या मदतीने शोध घेतला असता खोटले आणि पोईपच्या सीमेवर एका टेकडीच्या उतारावरील झाडाझुडपांमध्ये जांभ्या दगडात कोरलेली मानवाकृती निदर्शनास आली. वास्तविक हे एक कातळशिल्प असुन येथील लोकमानस त्याला ‘वेताळ’ म्हणुन ओळखते. यासंदर्भात काही लोककथाही या भागात प्रचलित आहेत.

या ‘वेताळा’ला नवसही बोलले जातात, अशी माहिती मिळाली.


‘वेताळा’चे हे कातळशिल्प पाहिल्यावर या परिसरात आणखी काही अशाच प्रकारची कातळशिल्पे असण्याची दाट शक्यता होती. तशी विचारणा करता काही ठिकाणी ‘पांडवांची चित्रे’ आहेत. लहानपणी आम्ही ती पाहिली आहेत. मात्र ती शोधावी लागतील, असे श्री. जंगले यांनी सांगितले. ते आणि याच परिसरातील दुसरे रहिवासी श्री. नारायण रामा मोडक यांच्या मदतीने सड्यावर शोध घेतला असता ठिकठिकाणी ३५ हून अधिक कातळशिल्पे आढळून आली.

या सर्व शिल्पांमध्ये भरलेली माती काढून त्यांची स्वच्छता करुन मोजमापे घेण्यात आली.


या कातळशिल्पांमध्ये सहा मनुष्याकृती, तीन चतुष्पाद प्राणी, दोन मासे, गोलाकृती व अन्य १२ अमूर्त शिल्पे, एक शिल्पपट्ट किंवा मांड याचा समावेश आहे.

यापैकी काही कातळशिल्पे झिजलेली असून काही अतिशय सुस्थितीमध्ये आहेत. अगदी सुरुवातीलाच २० फुट व्यासाचे एक वर्तुळाकृती कातळशिल्प नजरेला पडते. येथून अवघ्या काही फुटांवर एक मोठी चिरेखाण आहे. या ठिकाणाहून सुमारे अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर टेकडीच्या उतारावर झाडाझुडपांमध्ये एक सुस्पष्ट मानवाकृती दिसते.

तिच्या शिराकडच्या बाजुला दगडांचा मोठा ढिग आहे. स्थानिक रहिवासी याला ‘वेताळ’ म्हणुन ओळखतात. अशीच मानवाकृती हिवाळे, कुडोपी येथेही आढळली आहे. याचठिकाणी एक गुहासुद्धा आढळली. मात्र आता ती मातीने भरली आहे.

येथून आणखी सुमारे एक किलोमीटर परिसरात एका छोट्याशा टेकडीवर एकाच ठिकाणी विविध प्रकारची ३० कातळशिल्पे आढळून येतात. आमच्यासोबत असणाऱ्या स्थानिकांनीही ती प्रथमच पाहिली. या सर्व कातळशिल्पांमधील माती, गवत काढल्यानंतर ती स्पष्ट दिसु लागली.

याठिकाणी वाघासारख्या प्राण्याची दोन चित्रे अतिशय महत्वपूर्ण आहेत, अशी माहिती श्री. लळीत यांनी दिली.
‘लज्जागौरी’सदृश शिल्प आश्चर्यकारक  
खोटले येथे आढळलेल्या एका कातळशिल्पाचे ‘लज्जागौरी’ किंवा मातृदेवतेच्या मुर्तीशी विलक्षण साम्य आहे. हे शिल्प आश्चर्यकारक आहे. लज्जागौरी ही सुफलनाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. जगभरात एक काळ मातृसत्ताक पद्धतीचा होता, असे मानले जाते. त्याकाळी ही संकल्पना रुजली असावी, असे एक मत आहे.

शिवाय, स्त्रीच्या ठिकाणी असलेल्या उत्पत्तीच्या शक्तीमुळे तिला हे सन्मानाचे स्थान दिले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. सिंधु संस्कृतीशी संबंधित उत्खननात लज्जागौरीच्या काही प्रतिमा सापडल्या आहेत. अनेक आदिवासी समुह या देवीची पूजा करतात.

भारतात मध्य भारत, दख्खन, कर्नाटक, आंध्र भागात लज्जागौरीच्या मूर्ती, प्रतिमा सापडल्या आहेत. अमरावती येथे सापडलेली लज्जागौरीची संगमरवरी मूर्ती (सद्या चेन्नई वस्तुसंग्रहालयात आहे.) ही सातवाहन काळातील इ.स. १५० ते ३०० यादरम्यान कोरली असावी, असे तज्ञांचे मत आहे. इसवी सनाच्या सहाव्या ते बाराव्या शतकादरम्यान बदामी चालुक्य राजवंशाच्या काळातील अशा काही मूर्ती सापडल्या आहेत.

लज्जागौरी ही देवता शिरविरहीत असते. डोक्याऐवजी कमळाचे फुल असते. ही देवी सुफलनाचे प्रतीक असल्याने ती जननस्थितीमध्ये दाखवली जाते.

(Lotus headed Goddess in birthing posture) खोटले येथील हे कातळशिल्प आधुनिक काळातील लज्जागौरीशी विलक्षण साम्य दर्शवते. कदाचित आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे, अशी शक्यता आहे, असे मत श्री. सतीश लळीत यांनी व्यक्त केले आहे.


 या सर्व परिसरात चिरेखाणींचे साम्राज्य पसरले आहे. या खाणींमध्ये कितीतरी ‘पांडवांची चित्रे’ नष्ट झाली असे स्थानिकांनी सांगितले. याचठिकाणी असणाऱ्या सुमारे २० फुट लांब व २० फुट रुंद कातळशिल्पावर चिरेखाणीतील खराब तुटके चिरे व माती टाकून दिल्याने ते अत्यंत महत्वपूर्ण कातळशिल्प मातीखाली गेले, असे स्थानिकांनी सांगितले.

या चिरेखाणी अशाच अनिर्बंधपणे सुरु राहिल्यास भविष्यात यापैकी अनेक कातळशिल्पे काळाच्या उदरात गडप होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने व महसुल खात्याने याची दखल घेऊन या परिसरात चिरेखाणींची परवानगी देताना खाणचालकांना कातळशिल्पांचे जतन करण्याची अट घालूनच परवानगी द्यावी, अशी मागणी श्री. लळीत यांनी केली आहे.


सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात जांभ्या दगडाच्या सडेपठारांवर आढळणारी ही कातळशिल्पे म्हणजे आदिमानवाच्या या परिसरातील वास्तव्याच्या पाऊलखुणा आहेत. या कातळशिल्पांची निर्मिती मध्याश्मयुग ते नवाश्मयुग (इसवीसनपूर्व २० ते १० हजार वर्षे) या काळात झाली असावी.

या काळात मानव हा भटका शिकारी अवस्थेत होता. त्याला पशुपालन व शेतीचे ज्ञान नव्हते. कातळशिल्पे म्हणजे नेमके काय, त्यांचा कालावधी, ती कोरण्याचे उद्देश याबाबत आपण ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ या ग्रंथात सविस्तर माहिती दिली आहे.

जिज्ञासुंनी तो अवश्य वाचावा. अलिकडेच राज्य शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाने केंद्र सरकारमार्फत कातळशिल्पांना ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणुन मान्यता मिळावी असा प्रस्ताव ‘युनेस्को’ या जागतिक संस्थेकडे पाठवला होता.

तो प्राथमिक स्वरुपात स्वीकारुन त्यांचा समावेश तात्पुरत्या यादीत करण्यात आला आहे. यामघ्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी येथील कातळशिल्पांचा समावेश आहे. ही घटना केवळ जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्यादृष्टीनेही भुषणावह आहे, असे श्री. लळीत यांनी सांगितले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment