महाराष्ट्र मुंबई

ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज केला दाखल

बदलापूर – कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपच्या वतीने नुकतीच ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. तसेच ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी डोंबिवलीचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार किसन कथोरे उपस्थित होते. कोकण विभाग शिक्षकमतदारसंघाच्या गेल्या निवडणुकीत ६ हजारांहून अधिक म्हात्रे यांना मिळाली होती आणि ते दुसऱ्या क्रमांकावर होते. मागच्या वेळी म्हात्रे शिवसेनेतुन निवडणूक लढवली होती. तर यंदा त्यांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिल्याने ही लढत तुल्यबळ होणार हे निश्चित आहे.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर डोंबिवलीचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधानपरिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावू आणि विजय आमचाच होईल असे चव्हाण यांनी सांगितले.

मागच्या निवडणुकीत कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांचा विजय झाला होता. त्यावेळी पाटील यांना ११ हजार ८३७ मते मिळाली होती. तत्कालिन आमदार रामनाथ मोते, शिक्षक परिषदेचे वेणूनाथ कडू या दोन उमेदवारांमुळे ठाणे जिल्ह्यातील मतांमध्ये फुट पडली. त्याचा थेट फायदा बाळाराम पाटील यांना झाला. त्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला असे बोलले जाते. मागच्या निवडणूकीत पराभव झाल्यानंतर म्हात्रे यांनी आपली जनसंपर्क मोहिम जोरात राबवली. तब्बल सहा वर्षे म्हात्रे यांनी शिक्षक सेना आणि राज्य मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून कोकण विभाग पिंजून काढला आहे. या काळात शिक्षक मतदारांची नोंदणीही म्हात्रे यांनी करून घेतली. बाळाराम पाटील यांच्याशी लढत देण्याकरिता तेवढाच तगडा उमेदवार रिंगणात असावा या हेतूने भाजप व शिंदे गटाने आर्थिकदृष्ट्या तगड्या म्हात्रे यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे.

कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि शहरअध्यक्ष वामन म्हात्रे यांचे बंधू…
ज्ञानेश्वर म्हात्रे हे बदलापूरचे रहिवासी असून कुळगाव – बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि शहरअध्यक्ष वामन म्हात्रे यांचे बंधू आहेत. बदलापुरातील शिवभक्त विद्यामंदीर शाळेचे संचालक असून येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. तसेच अंबरनाथ तालुक्यातील सिंड्रेला इंग्लिश स्कुल, शंभूराजे प्राथमिक विद्यामंदीर, एम. के. पाटील विद्यामंदीर या शाळांमध्ये ते संचालक म्हणूनही काम पाहतात.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment