मुंबई : पालिकेची निवडणूक जवळ येत असून प्रत्येकाने आपापल्या विभागात काम करत राहा. तुम्ही माजी नगरसेवक असलात तरी काम करत राहा, कामे होत नसतील तर आयुक्त, उपायुक्तांची भेट घ्या, पाठपुरावा करा. सध्या विविध आजारांचे रुग्ण वाढत असून लोकांना मदत करण्याचे काम करा. आता तुम्ही नगरसेवक नसला तरी लोकांशी आपली नाळ जोडलेली आहे, लोकांचा आपल्यावर विश्वास आहे त्यामुळे लोकांसाठी काम करत राहा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेवकांच्या बैठकीत केले. सध्याच्या राजकीय घडामोडी लक्षात घेत निवडणूकांच्या तोंडावर कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, हेही त्यांनी आवर्जून सांगितले.
मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवकांची तातडीची बैठक शुक्रवारी शिवसेना भवन येथे बोलावण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, सुभाष देसाई, आमदार अॅड. अनिल परब, आमदार रवींद्र वायकर उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना येत्या निवडणुकांच्या तोंडावर कशा पद्धतीने काम करायला हवे याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक माजी नगरसेवकांने आपापल्या विभागात काम करत राहावे, सामाजिक बांधिलकी जपत लोकांची कामे करा, असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले. निवडणुकीत अन्य पक्षांकडून उमेदवारांना आमिष दाखवले जाऊ शकते, यााबबतही त्यांनी नगरसेवकांना सावध केले. तुम्हालाही फोन येतील पण तुम्ही आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी नगरसेवकांना केले.