साहित्य

डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीला भोगावी लागतेय उपेक्षा

सदस्य सचिवांना कोणत्याच सुविधा नाही

तुटपुंजे मानधन, अपुरे मनुष्यबळामुळे आंबेडकरी साहित्य प्रकाशनाला होतोय विलंब

खंडुराज गायकवाड मुंबई :
उठसूठ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन एकमेकांना लक्ष्य करणाऱ्या, हे राज्य फुले-शाहू-आंबेडकरांचे आहे हे तुणतुणे सतत वाजविणारे राज्यातील सर्वपक्षीय राज्यकर्ते हे डॉ.आंबेडकर आणि त्यांच्या विचारांच्या प्रसारासाठी काम करीत असल्याचे दावे करीत असले तरी वास्तव मात्र वेगळेच असल्याचे धक्कादायक चित्र उघडकीस आले आहे.


बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी कोट्यवधीची तरतूद करून आम्हीच बाबासाहेबांचे खरे अनुयायी असल्याचे दावे करणाऱ्या राज्यकर्त्यांची बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रसारासाठी मात्र पैसा खर्च करण्याची तयारी नसते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे लेखन आणि भाषणे संकलित आणि संपादित करून प्रकाशित करण्याचे अतिशय महत्वाचे आणि ऐतिहासिक असे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रे साधने प्रकाशन समिती करीत असते.

या समितीचे सदस्य सचिव हे प्रत्यक्ष या कामाचे नेतृत्व करीत असतात. प्रकाशनासाठी साहित्याची निवड करणे, प्रकाशनाचे प्राधान्यक्रम ठरविणे, निर्दोष प्रकाशन व्हावे म्हणून प्रकाशित पुस्तकांवर संपादकीय संस्कार करणे ही महत्वाची कामे सदस्य सचिवांना पार पाडावी लागतात.

बाबासाहेबांचे इतरत्र विखुरलेले साहित्य,हस्तलिखिते गोळा करून ती वाचून विविध विषयवार संगती लावून ते प्रसिद्ध करणे हे जिकिरीचे कामही सदस्य सचिवाला करावे लागते. यासाठी सदस्य सचिवाला राहण्यासाठी शासकीय निवासस्थान आणि वाहन व्यवस्थाच सरकारकडून दिली जात नाही,हे धक्कादायक आहे.

त्यामुळे इच्छा असूनही मुंबईत ठाण मांडून हे काम वेगाने पूर्ण करणे सदस्य सचिवांना जमत नाही,ही आंबडेकरी चळवळीसाठी शोकांतिका आहे. याहुन क्रूर थट्टा म्हणजे हे महत्वाचे कार्य करणाऱ्या सदस्य सचिवांना महिन्याला या कामासाठी केवळ १० हजार रुपये मानधनावर काम करावे लागते.

हे ठरलेले मानधन ही त्यांना महिनोमहिने मिळत नाही. त्यामुळे सदस्य सचिव पूर्ण वेळ काम करु शकत नाही. म्हणून समितीच्या प्रकाशनाचे कार्यक्रम मागील अनेक वर्षापासून अतिशय संथ गतीने सुरु असल्याची धक्कादायक माहिती उच्च न्यायालयाने या विषयावर स्वतःहून एक याचिका दाखल करून घेतल्यावर उघडकीस आली.

या समितीच्या स्थापनेला ४० वर्षे झाली. यापैकी प्रदीर्घ काळ वसंत मून हे सदस्य सचिव होते.
मून हे अधिकारी पदावर असल्यामुळे त्यांना निवास आणि इतर सर्व सोयी सुविधा देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या सदस्य सचिवांपैकी बहुसंख्य निवृत्त प्राध्यापक असल्याने त्यांना या सोयी उपलब्ध नाहीत.

त्यांच्यानंतर गेल्या २० वर्षांत या समितीवर आजपर्यंत विचारवंत हरी नरके, प्रा. दत्ता भगत आणि प्रा.अविनाश डोळस यांनी काम केले आहे. या सर्वांनाही निवासस्थान व वाहन व्यवस्थेचा अभाव, तुटपुंजे मानधन यांचा सामना करावा लागला.


समितीचे विद्यमान सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे हे नागपूर विद्यापीठात ‘ आंबेडकर विचारधारा’ विभागाचे 23 वर्ष प्रोफेसर आणि विभागप्रमुख होते. ते मागील सहामहिन्यांपासून शासकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहून काम करतात. तेथे बाथरूम आणि टॉयलेट कॉमन आहे. यापूर्वीचे सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांना देखील याच वसतिगृहात अशाच पद्धतीने राहावे लागले.


अपुरे मनुष्यबळ
समितीच्या कार्याला मदत करण्यासाठी संशोधक सहाय्यक हे पद ही मंजूर असले तरी ते सुद्धा गेल्या चार दशकात भरले गेलेले नाही. समितीला आवश्यक असलेले मनुष्यबळही पुरविण्यात आले नसून जे कर्मचारी आहेत त्यांनाही तुटपुंजे मानधन आहे.अशा परिस्थितीत समिती हे कार्य संथ गतीने करीत आहे. असा सर्व स्तरातून आरोप केला जातो. परंतु सदस्य सचिवाना मात्र कसल्या सोयी नाहीत. मग ते अधिक कार्यक्षमतेने काम कसे कारणार?

बरेच साहित्य अप्रकाशित

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अद्यापही बरेच साहित्य अप्रकाशित आहे. सध्या डॉ. आंबडेकर समग्र साहित्याचा २३ वा खंड प्रकाशनाधिन आहे. तसेच जनता साप्ताहिकातील लेखांचा दुसरा खंड प्रकाशनाच्या वाटेवर आहे. या शिवाय बाबासाहेबांशी संबंधित सोर्स मटेरियलचे ही अनेक खंड निघू शकतील इतके साहित्य उपलब्ध आहे.


४० वर्षात माहिती तंत्रज्ञान आणि प्रकाशन तंत्रज्ञान यांच्यात खूप प्रगती झाल्याने किमान आतातरी हे ज्ञानाचे भंडार लोकांसाठी खुले होईल ही अपेक्षा आहे. मात्र त्यासाठी गरज आहे सरकारच्या टिकावू आंबेडकर प्रेमाची केवळ दिखाऊ आंबेडकर प्रेम यासाठी चालणार नाही,अशी भावना आंबेडकरी जनता व्यक्त करीत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment