पश्चिम महाराष्ट्र

गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे पडले महागात…

पुणे(पिंपरी) – पुण्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्यात अनेक घटना देखील समोर येत आहेत. अनेक घटना मोबाईलमुळे देखील घडलेल्या आपण पाहत आहोत. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड परिसरातून समोर आली आहे. पिंपरी चिंचवड परिसरातल्या पिंपळे गुरव भागात रस्त्यावर जाणाऱ्या दुचास्वराला दुचाकीवर फोनवर बोलणे जीवावर बेतले आहे. त्याला त्यात स्वतःचा जीव गमावावा लागला आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटिव्हीत कैद झाला आहे.

शैलेश गजानन जगताप (वय- २९) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिंपळे गुरव परिसरातील रामकृष्ण मंगल कार्यालय परिसरातून शैलेश जगताप हे काटे पुरम चौकाकडे जात होते. दुचाकीवरून जात असताना शैलेश हा मोबाईल वर बोलत चालला होता. त्यामुळे एका हातात गाडीचा हांदेल आणि दुसऱ्या हातात मोबाइल. या मोबाईलवर कुणाशी तरी जोरात बोलत चालला होता. तेवढ्यात रस्त्यावर असणाऱ्या स्पीड ब्रेकरच्या पट्ट्याचा अंदाज त्याला आला नाही आणि तो उडून थेट जवळून जाणाऱ्या स्कूल बसच्या मागच्या चाकाखाली गेला. डोळ्याच्या पापण्या मिटायच्या आत त्याच्या स्कुलबसचे चाक त्याच्या अंगावरून गेले. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

शैलेश ने गाडीवर असताना हेल्मेट वापरले असते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. शैलेशच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. दुचाकी चालवताना प्रत्येकाने हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणे टाळणे गरजेचे आहे नाहीतर आपल्याला आपला जीव गमवावा लागू शकतो. असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या भागात होणाऱ्या दररोजच्या अपघातांच्या घटनांमुळे या भागात स्पीड ब्रेकर लावावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment