पश्चिम महाराष्ट्र

डी वाय पाटील शेती फार्मवर ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक

तळसंदे – कृषी क्षेत्रात पिक संरक्षण तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक बाब असून यामध्ये ड्रोन तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावू शकते. शेतीतील डिजीटल तंत्रज्ञानचा महत्त्वाचे अंग असणाऱ्या ड्रोनद्वारे, कॅमेरा व सेंसर तंत्रज्ञानाचा वापर करत कार्यक्षमरित्या पीक पाहणी व निरीक्षण, जमिनीतील शुष्कता, पिकांवरील रोग व निदान, कीड-किटकनाशकांची फवारणी करणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठ, तळसंदेचे कुलगुरू प्रा.(डॉ.) के. प्रथापन यांनी केले.

डी वाय पाटील शेती फार्म, तळसंदे येथे कीडनाशक बुरशीनाशक व कीटकांची औषधा विरोधात प्रतिकारक्षमता वाढू नये म्हणून निमार्क जैविक कीटकनाशक असे तीन घटक एकत्र करून पाण्यातून ड्रोनद्वारे नारळबागेवर फवारण्यात आले. या प्रात्यक्षिकावेळी आधुनिक, एकात्मिक शेतीमध्ये ड्रोनचा वापर सिंचन निरीक्षण, पीक आरोग्य देखरेख, पीक नुकसान मुल्यांकन, मृद विश्लेषण इत्यादी कामांसाठी केला जावू शकतो, असे प्रा.(डॉ.) के. प्रथापन यांनी सांगितले.

पिक संरक्षण ही बाब खर्चिक असून फवारणीसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध न होणे, ही सद्य परिस्थितीमध्ये सर्वात मोठी समस्या निर्माण झालेली आहे. कुशल मजुरांचा प्रश्न, निविष्टांचा खर्च, बदलते हवामान, कमी होणारे पाणी या समस्यांवर किमान श्रमामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाच्या आधारे मात करणे शक्य आहे. ड्रोनच्या वापरामुळे इंधनामध्ये आणि वेळेमध्ये बचत होत असल्याचे फार्म हेड प्रा. अमोल गाताडे यांनी सांगितले

या वेळी उपस्थित कृषि पदवी अभ्यासक्रमाच्या व कृषि अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अमूल्य ऍग्रोबोटचे सहाय्यक व्यवस्थापक राहुल मगदूम यांनी तांत्रिक बाबींची तर कृषि विज्ञान केंद्राचे विषयतज्ञ मधुकर माळी, यांनी एकात्मिक पीक संरक्षण व ड्रोन फवारणीची माहिती दिली.

या प्रसंगी कृषि अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जयंत घाटगे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. विनायक शिंदे, कृषि विज्ञान केंद्र, तळसंदेचे विषयतज्ञ दीपक पाटील, राजवर्धन सावंत-भोसले, प्रक्षेत्र व्यवस्थापक, निलेश पाटील, इत्यादी उपस्थित होते. पुढील काळात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अशा आधुनिक तंत्रज्ञानानी प्रात्यक्षिके डी वाय पाटील शेती फार्म येथे प्रत्यक्ष पाहता येतील, परिसरातील शेतकऱ्यांना याद्वारे फायदा होईल.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment