पश्चिम महाराष्ट्र

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात कौशल्य व रोजगारवाढीवर कार्यशाळा

कोल्हापूर – नांदी फौंडेशन, महिंद्रा प्राईड कलासरूम व डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास व रोजगारवाढीवर एक आठवड्याची कार्यशाळा संपन्न झाली. ही कार्यशाळा प्रामुख्याने एमबीए, एमसीए व एम.टेक च्या अंतिम वर्षातील विद्यार्थिनीसाठी आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी कुलगुरू डॉ.के प्रथापन, कुलसचिव डॉ.जयेंद्र खोत, प्रोफेसर डॉ.अनिल गायकवाड, असोसिएट डीन डॉ.संग्राम पाटील, कार्यशाळा मार्गदर्शक अपूर्वा ओक, कीर्ती गाडे यांच्यासहित आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांची कौशल्ये विकसित होण्यासाठी मुलाखत कौशल्य, संभाषण कौशल्य, सांघिक चर्चासत्र, वेळेचे नियोजन, व्यक्तिमत्व विकास, बायोडेटा लेखन इत्यादी महत्वाच्या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना कुलगुरू डॉ.के प्रथापन म्हणाले ” विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत शिकलेली सर्व कौशल्ये त्यांच्या पुढील करिअरसाठी उपयुक्त ठरणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे” कुलसचिव डॉ.जयेंद्र खोत म्हणाले ”विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी निडर व्हायला हवे. कोणतेही काम हाती घेतले की ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.”

ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रा. डॉ.अनिल गायकवाड, नांदी फौंडेशनच्या झोनल हेड सीमा भागवत व स्टेट कोऑर्डिनेटर पंकज दांडगे यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेसाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment