पश्चिम महाराष्ट्र

विशाळगडावरील अतिक्रमणावर हातोडा

कोल्हापूर – विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याबाबत माजी खासदार संभाजीराजे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आज वन विभागाने कारवाई करत गडबुरुज, पायथ्यावरील दोन अतिक्रमणे जमीनदोस्त केली. पक्की बांधकामे असणाऱ्या संबंधित अतिक्रमणधारकांनी १५ दिवसांत बांधकामे काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई करू, अशी सूचना उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी दिली. सकाळी आठच्या सुमारास वन विभागाचे पथक पायथ्याशी पोहोचले. तेथे वन विभागाच्या हद्दीत असणारे गडबुरुजाजवळील दस्तगीर इस्माईल मुजावर यांचे शेड व पायथ्याजवळचे धोंडू धुमक यांचे शीतपेय दुकानच्या शेडवर कारवाई केली.

पायथा परिसरात वन विभागाच्या मालकीच्या सुमारे एकरभर जागेत पक्की विटांची २० हून अधिक अतिक्रमणे आहेत. त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ही सर्व बांधकामे संबंधितांनी स्वतः पंधरा दिवसांत काढून घ्यावीत, असा सूचना इशारा जी. गुरुप्रसाद यांनी संबंधितांची बैठक घेऊन दिला. गडावर शासकीय जागेत आणि पायथा परिसरात वन विभागाच्या जागेत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. ती काढण्याबाबत अनेकवेळा चर्चा झाल्या. मात्र, आज वन विभागाने प्रत्यक्षात अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. आजच्या मोहिमेत गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली पेंडाखळे विभागाचे परिक्षेत्र अधिकारी आर. एस. सूर्यवंशी, वनपाल एन. डी. नलवडे, एस. एस. खुपसे, आर. आर. शेळके सहभागी झाले होते.

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात सोमवारी (ता. १२) मंत्रालयात बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत अतिक्रमण कोणत्या पद्धतीने काढावे यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यात विशाळगड ग्रामस्थांनीही अतिक्रमण केल्याबाबतची कबुली देत अतिक्रमण काढण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले होते. त्यानुसार सोमवारी मंत्रालयात अतिक्रमण काढण्यासंदर्भाची चर्चा केली जाऊन त्यानुसार ॲक्शनप्लॅन केला जाणार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment