पश्चिम महाराष्ट्र

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभाग सतर्क

सांगली – ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बाहेरून मद्य येण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने जोरदार तयारी केली आहे. प्रत्येक तालुका पातळीवर भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. त्याशिवाय सीमाभागात तपासणी नाके सुरू करण्यात आलेले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक काळात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी या विभागाने १२१ जणांवर कारवाई करून २० लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नववर्षाच्या सुरुवातीला बाहेरच्या राज्यातून बेकायदा दारू न येण्याची खबरदारी या विभागामार्फत घेण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर भरारी पथके हॉटेल, धाबे यांची तपासणी करणार आहेत. जत, मिरज तालुक्याच्या सीमाभागात तपासणी नाके सुरू करण्यात आलेले आहेत. रेल्वेतून येणाऱ्या दारूवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वेचीही तपासणी करण्यात येणार आहे. या काळामध्ये दारू पिण्यासाठी परवाने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एकदिवशीय देशी दारूसाठी दोन रुपये, विदेशी दारूसाठी पाच रुपये तर वर्षभर दारू पिण्यासाठी शंभर रुपये दारू परवाना शुल्क ठेवण्यात आले आहे.

या पथकांनी गेल्या महिन्याभरात १३० ठिकाणी कारवाई केली. यामध्ये इस्लामपूर विभागात १४ कारवाया करीत पंधरा जणांना अटक करून एक वाहन जप्त केले. सुमारे ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मिरज विभागामध्ये ३० कारवाया करून २७ जणांना अटक केली. तीन वाहने जप्त करीत अकरा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सांगली शहरी भागात १९ कारवाया करून १४ जणांना अटक केली. सुमारे तीन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विटा विभागामध्ये सर्वाधिक ३७ कारवाया करून ३७ जणांना अटक करण्यात आली. या विभागामध्ये ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment