करोनाने मनोरंजन जगताला ब्रेक लागला आणि त्याचे जे काही परिणाम झाले त्याची सविस्तर मांडणी करायची झाल्यास त्याचा चार टप्प्यांमध्ये वेध घ्यावा लागेल. मनोरंजनक्षेत्र हे चार प्रकारात विभागले आहे. सिनेमा इंडस्ट्री, टीव्ही मालिका, नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रम. परंतु हे विभागच ठप्प झाल्यामुळे ज्यांच्या आयुष्याचे आर्थिक गणित कोलमडले त्या कलाकारांवरही लॉकडाऊनचा फार मोठा परिणाम झाला.
By : अनुराधा कदम
मनोरंजनक्षेत्र. मग ते सिनेमागृह असो, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा नाटक असो. मायबाप प्रेक्षक आणि प्रेक्षकांना आसुसलेला कलाकार यांच्यातील अंतर मिटवणारा पडदा हा समानधागा असतो. टीव्हीविश्वात जरी प्रत्यक्ष पडदा नसला तरी घरात बसून प्रेक्षक आपल्या आवडत्या मालिका छोट्या पडद्यावरच पाहत असतात.
थोडक्यात काय तर मनोरंजनक्षेत्रात पडदा उघडणे म्हणजे नांदी असते. सुरुवात असते. पुढचे दोन ते तीन तास प्रेक्षक त्या कलाकृतीमध्ये हरवून जाणार असतात. पण…दीड ते पावणेदोन वर्षापूर्वी आलेल्या कोरोना नावाच्या संकटाने मनोरंजनावरच पडदा पडला. पूर्णपणे ठप्प झालेली मनोरंजनसृष्टी रुळावर यायला पुरती दीड वर्षे जायला लागली. अजूनही संभाव्य तिस-या लाटेचे सावट आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
करोनाच्या मगरमिठीत गेलेल्या आपल्या देशात २२ मार्च २०२० ला लॉकडाऊन सुरू झाला. अनेक लोक एकत्र येतात अशाठिकाणांवर लॉकडाऊनचा पहिला हातोडा बसला. ज्यामध्ये शाळा, कॉलेज, मॉलसह सिनेमागृहे, नाट्यगृहे, सिनेमा व मालिकांची चित्रिकरणस्थळे जिथल्यातिथे थांबवण्यात आले. करोनाचा परिणाम ज्या ज्या घटकांवर झाला त्यापैकी सिनेमांचे चित्रीकरणस्थळ, थिएटर, मालिकांचे सेट, नाट्यगृह यांचा समावेश आहे.
करोनाने मनोरंजन जगताला ब्रेक लागला आणि त्याचे जे काही परिणाम झाले त्याची सविस्तर मांडणी करायची झाल्यास त्याचा चार टप्प्यांमध्ये वेध घ्यावा लागेल. मनोरंजनक्षेत्र हे चार प्रकारात विभागले आहे. सिनेमा इंडस्ट्री, टीव्ही मालिका, नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रम. परंतु हे विभागच ठप्प झाल्यामुळे ज्यांच्या आयुष्याचे आर्थिक गणित कोलमडले त्या कलाकारांवरही लॉकडाऊनचा फार मोठा परिणाम झाला.
हिंदी आणि मराठी सिनेमाइंडस्ट्रीचे करोनामुळे झालेले नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे. निर्मात्यांनी लावलेला पैसा आज दीड वर्षे झाले तरी वसूल झालेला नाही, उलटपक्षी अनेक सिनेमे निम्म्याहून अधिक शूटिंग पूर्ण होऊनही डबाबंद करण्याची वेळ निर्मात्यांवर आली. ज्यामध्ये करण जोहरचा दोस्ताना टू सारखा बिग बजेट सिनेमाचाही समावेश आहे.

तर जे बहुचर्चित आणि बिगबजेट सिनेमे पूर्ण झाले होते आणि प्रदर्शित होणार होते त्यांचे प्रदर्शनच थांबल्याने आर्थिक गुंतवणूक कोलमडली ती वेगळीच. २०२०च्या जानेवारीला तान्हाजी…द अनसंग हिरो हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाचे जोरदार प्रमोशन झाले होते.
तोपर्यंत भारतात कोरोनाचा शिरकाव झाला होता पण त्याची मुळे दिल्लीपर्यंतच होती. चीनपासून सुरू झालेला करोनासंसर्गाने जगातील इंग्लंड, रशिया, जपान, फ्रान्स, अमेरिका या देशांना विळखा घालून भारतात दहशत निर्माण केली तोपर्यंत फेब्रुवारीचा दुसरा आठवडा उजाडला होता. महाराष्ट्रात करोनाचे हातपाय ख-या अर्थाने पसरले ते मार्चच्या सुरुवातीला. तान्हाजी सिनेमाने सगळे रेकॉर्ड मोडत बॉलिवूडमध्ये दबदबा निर्माण केला होता.
तर अनेक हिंदी सिनेमे प्रदर्शनाच्या तयारीत होते. रोहित शेट्टीच्या सिंघम मालिकेतील चौथा सीझन सूर्यवंशीची घोषणा झाली होती. तर टायगर श्रॉफच्या बागी ३ ची चर्चा होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात बागी ३ प्रदर्शित झाला तेव्हा करोनाची भीती असूनही किमान लोक थिएटरमध्ये जाण्याचे धाडस करत होते. १६ मार्चपासून थिएटर बंद झाली. १९ मार्चपासून टीव्ही मालिकांची चित्रीकरणे आहे त्या स्थितीत थांबवण्याचे आदेश देण्यात आले. नाटकांचे प्रयोग थांबवून दौ-यासाठी सुरू झालेल्या प्रवासाला ब्रेक लागला.

लग्न फक्त वीस जणांच्या उपस्थितीत करण्याचे फर्मान निघाल्याने यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांवर फुली मारण्यात आली. मनोरंजनक्षेत्रावर करोनाचा परिणाम होण्याची एकेक पायरी सुरू झाली. दरवर्षी हिंदी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये ३५० सिनेमे प्रदर्शित होतात तर मराठीमध्ये दरवर्षी २०० सिनेमे पडद्यावर येतात. सिनेमा स्क्रिप्ट टू स्क्रिन तयार होतो तेव्हा त्या प्रवासात जवळपास ५०० असतात. लाइटमन, स्पॉटबॉय, इस्त्रीमनपासून ते सेलिब्रिटी कलाकार, दिग्दर्शक निर्मात्यापर्यंत सर्वांनाच करोनाचा फटका बसला.
मराठी सिनेमांबाबत सांगायचे तर दरवर्षी मराठीमध्ये २०० सिनेमे तयार होतात. त्यापैकी सत्तर ते ऐंशी सिनेमे बिगबजेट असतात आणि त्यातले आठ ते दहा हिट होतात. लॉकडाऊन लागण्यापूर्वी झिम्मा, बस्ता, अजिंक्य, पावनखिंड या सिनेमांसह सव्वाशे सिनेमे प्रदर्शनासाठी तयार होते.
मात्र सगळेच ठप्प झाल्याने या सिनेमांना पडद्यावर येण्यासाठी करोनाची दुसरी लाट ओसरण्याची वाट पहावी लागली. थिएटरच बंद असल्याने तयार असलेला सिनेमा प्रदर्शित होऊ शकते नाहीत. अर्थात यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मला सुगीचे दिवस आले. आता करोनानंतरही ओटीटीवर सिनेमा, वेबसीरिज प्रदर्शित करण्याकडे कल वाढला आहे, हा काळानुरूप झालेला बदलच म्हणावा लागेल.
सिनेमांप्रमाणे नाटकालाही करोनाचा चांगलाच फटका बसला. नाटक संपल्यानंतर पडणारा पडदा हा नाटकाशी निगडीत कलाकार, तंत्रज्ञ आणि रसिकांनाही समाधान देणारा असतो, मात्र करोनामुळे रंगभूमी गेल्या दीड वर्षापासून पडद्यामागे स्तब्ध झाली.
त्याचा आर्थिक, मानसिक फटका नाट्यक्षेत्रातील प्रत्येकाला बसला. जेव्हा करोनाच्या पहिल्या लाटेला थोपवण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाले तो मार्च महिना होता. परीक्षा संपल्यानंतर म्हणजे एप्रिल ते जून अखेर पर्यंतचा काळ नाटकांच्या प्रयोगासाठी सुगी असतो.
नाटकांचे दौरे आखले गेले होते. कलाकारांच्या तारखा ही ठरल्या होत्या. काही नवी नाटके रंगभूमीवर येण्याच्या तयारीत होती. निर्मात्यांनी पैसे लावले होते. नाट्यगृह व्यवस्थापनाशी बोलणी झाली होती. पण कारणच इतके गंभीर होते की या सगळ्यालाच पूर्णविराम देण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. जेव्हा लाट ओसरली आणि व्यवहार सुरू होऊ लागले होते.
परंतु यामध्येही नाट्यगृह, सिनेमागृह उघडण्याचा निर्णय सर्वात शेवटी घेण्यात आला. हे सुरू करण्यासाठीही रंगकर्मींना आंदोलन करावे लागले. राज्यभर कलाबाजार आंदोलन करून कलाकारांनी रस्त्यावर कला सादर करून सरकारला हाक दिली. अखेर दीड वर्षानी नाट्यगृहे सुरू झाली. मात्र त्या दीड वर्षांत अनेक नाट्यकलाकारांची आर्थिक स्थिती बिघडली ती अजूनही मार्गी लागलेली नाही.
जवळपास नाट्यक्षेत्र, सिनेमा आणि मालिका या क्षेत्रातील दीडशेहून अधिक कलाकारांचा करोनाने बळी गेला. पडद्यामागे काम करणा-यांचे आर्थिक स्त्रोत थांबल्याने त्यांनी प्रसंगी भाजी विकण्याचे काम केले. अर्थात सांस्कृतिक क्षेत्रातील काही संस्था या हातावरचे पोट असलेल्या कलाकारांसाठी धावून आल्या. मदतीचे हात सरसावलेही पण करोना संकट प्रत्येकाच्याच डोक्यावर असल्याने मदतीलाही सीमा होतीच.
करोनाकाळात प्रत्यक्ष नाट्यप्रयोग थांबले असले तरी कलात्मक माणसाला सृजनशीलता स्वस्थ बसू देत नाही म्हणतात त्याप्रमाणे ‘आठशे खिडक्या नऊशे दारे’ या नाटकाने एक वेगळा प्रयोग सादर केला. यामध्ये कलाकारांनी आपापल्या घरी मोबाइलवर सीन शूट केले आणि त्यातून हे नाटक आकारला आले. तीच गोष्ट अभिनेते हृषिकेश जोशी यांच्या पुढाकाराने ‘नेटक’ या प्रयोगातून घडली.
करोनाची साथ तीन ते चार महिन्यांत ओसरेल अशी भाबडी आशा घेऊन इतर क्षेत्राप्रमाणे नाट्यक्षेत्रातील प्रत्येकाचे डोळे अनलॉककडे लागले होते. पण नाट्यक्षेत्राचे मुख्य केंद्र असलेल्या मुंबईतही करोनाचे रोज हजाराच्या संख्येत बळी जात होते. नाट्यरसिकांचा प्रतिसाद असलेल्या पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, कोकण या शहरातही करोनाने धुमाकूळ घातला होता.
करोनाची लाट कधी ओसरतेय आणि पुन्हा पडदा कधी खुला होतोय ही वाट पाहत २०२० चा जुलै उजाडला तरी परिस्थिती काही हातात येत नव्हती. नाट्यक्षेत्रातील नावाजलेल्या रंगकर्मींच्याही हातातील शिल्लक संपत आली तिथे रोजंदारीवर किंवा प्रयोगावर पैसे मिळणा-या पडद्यामागच्या कामगारांचे आर्थिक हाल व्हायला सुरुवात झाली. रंगभूमीवर नाटकाचे अंक रंगायचे सोडून करोनाकाळाचा भयाण अंक सुरू झाला तो तिथपासूनच.
नाट्यक्षेत्रातील अनेक ज्येष्ठच नव्हे तर तरुण कलाकारांनाही करोनाने मृत्यूचा विळखा घातला. गेल्या वर्षभरात किमान ६० ते ६५ कलाकार करोनाचे बळी ठरले. २००-२५० कलाकार करोनाबाधित झाले. त्यापैकी अनेकांची प्रकृती इतकी गंभीर होती की जी काही जमापुंजी होती ती उपचाराच्या खर्चासाठी संपली. नाट्यक्षेत्रातील स्थिरस्थावर कलाकारांनी मात्र माणुसकी जपत अनेकांसाठी मदतीचा हात दिला. करोनाने नात्याची, माणुसकीची किंमत दाखवली त्याला नाट्यक्षेत्रही अपवाद नव्हते…
ही बाब नक्कीच दिलासादायक म्हणावी लागेल.