पश्चिम महाराष्ट्र

कट्टर मित्र लाल मातीच्या आखाड्यात भिडले

पुणे – पुण्यातील कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी येथे सुरु असलेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माऊली उर्फ ज्ञानेश्वर जमदाडेला जामदाडेला पराभवाचा धक्का बसला आहे. आपलाच सराव सहकारी सिकंदर शेख यांच्याकडून माऊलीला पराभव स्वीकारावा लागला आहे.

महाराष्ट्र केसरीच्या लालमातीच्या आखाड्यात दोन जवळचे मित्र एकमेकांना भिडले. माऊली जमदाडे आणि सिकंदर शेख यांची लाल मातीत झालेली लढत डोळ्यांचं पारणं फेडणारी ठरली. माऊली मूळचा अमरावतीचा आणि सिंकदर वाशीमचा. पण हे दोघेही कुस्तीचे धडे कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत एकत्र गिरवत आहेत. वस्ताद विश्वास हरगुले यांचे हे दोन्ही पठ्ठे, अर्थात गुरुबंधू आहेत.

आखाड्यात पाय टाकला की मित्रत्व, शत्रुत्व आणि नाती, असं सारं काही विसरून समोरचा पैलवान हा प्रतिस्पर्धी आहे, इतकाच विचार पैलवानांच्या मनात असतो. माऊली आणि सिकंदरच्या लढाईतही हेच जाणवलं. कुस्तीचा तडाखेबाजपणा पाहाता ही कुस्ती मित्रांमध्येच सुरु आहे, असं कोण म्हणूही शकलं नसतं. दोन मित्रांची लढाई इतकी रंजक आणि तोडीस तोड होऊ शकेल, ही कल्पना केवळच कुस्तीतच होऊ शकते.

माती विभागातून अतिशय चुरशीच्या लढतीत सिकंदर शेखने माऊली जमदाडेला ९-४ असे पराभूत करताना स्पर्धेत आगेकूच केली. सुरुवातीलाच सिकंदरने माऊलीवर ताबा घेताना २ गुण मिळविले. माऊली जमदाडेने पहिल्याच प्रयत्नात दुहेरी पट काढताना थेट ४ गुणाची कमाई केली. त्यानंतर सिकंदर शेखने शक्ती आणि युक्तीची सांगड घालत माऊलीचा ताबा घेत २ गुणांची कमाई केली. त्यानंतर माऊली जमदाडेने दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला परंतू हा डाव उलटून टाकताना सिकंदरने ४ गुणाची कमाई केली. त्यानंतर दोघांनी देखील एकमेकांवर डाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतू यात माऊली जमदाडे याला बाहेर वर्तुळाच्या बाहेर ढकलत सिकंदरने गुणाची कमाई करताना विजय मिळविला.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment