विदर्भ

शेतक-यांनी सरकारच्या विजयाच्या उपहासात्मक घोषणा देत अनोखा निषेध नोंदवला

अमरावती – बागो में बहार है ऐकायची सवय झालेल्या राज्य सरकारच्या विरोधात अमरावतीच्या माजी पालकमंत्री तथा काँग्रेस आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत एक अनोखे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या, वेळेवर वीज न देणाऱ्या सरकारच्या विजयाच्या घोषणा शेतक-यांनी देत अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला.

वीज वितरण कंपनीच्या विरोधात मोर्शी तालुक्यातील अडगाव – यावली या रस्त्यावर शेकडो शेतक-यांनी ठिय्या आंदोलन केले. मागील १० दिवसांपासून महावितरण कंपनीकडून या भागातील शेतक-यांना वीजपुरवठा केला जात नव्हता. त्यामुळे शेतक-यांच्या कृषीपंपांना वीजपुरवठा मिळत नव्हता. अशा परिस्थितीत संतप्त शेतक-यांनी आज ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात ॲड. यशोमती ठाकूर सहभागी झाल्या होत्या. शेतक-यांच्या प्रश्नांची दखल न घेणा-या राज्य सरकारविरोधात यावेळी शेतक-यांनी उपहासात्मक घोषणाबाजी केली. ॲड. यशोमती ठाकूर यांनी,” शेतक-यांचा अपमान करणा-या सरकारचा” अशी घोषणा देताच शेतक-यांनी “नाकर्त्या सरकारचा विजय असो” अशी उपहासात्मक घोषणा देत प्रतिसाद दिला.

ॲड. यशोमती ठाकूर यांनी महावितरण कंपनीच्या अधिका-यांना आंदोलनस्थळी बोलावून घेतले. यावेळी महावितरण कंपनीचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यामध्ये ॲड. यशोमती ठाकूर यांनी संवाद घडवून आणला. कुठल्याही परिस्थितीत शेतक-यांचा वीजपुरवठा तात्काळ सुरू करण्याची सूचना त्यांनी महावितरणच्या अधिका-यांना केली. त्यावर खंडित झालेला वीज पुरवठा एका दिवसामध्ये सुरू करण्याचे आश्वासन महावितरण कंपनीच्या अधिका-यांनी दिले. त्यामुळे ॲड. यशोमती ठाकूर यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment