पश्चिम महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी गुळ विक्रीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

कोल्हापूर – जिल्ह्यातील प्रत्येकाने गुळाच्या दैनंदिन वापरावर भर देण्याची आवश्यकता असुन गुळ उत्पादकांनी गुळाच्या विक्री व्यवस्थेमध्ये क्युआर कोड सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले.

नाबार्ड, प्रादेशिक गुळ संशोधन केंद्र व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने कृषि क्लिनिक आणि कृषि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, मोरेवाडी येथे प्रभारी जिल्हाधिकारी शिंदे यांच्या हस्ते दोन दिवसीय भौगोलिक मानांकन प्रमाणित निर्यातक्षम गुणवत्तेचा गुळ बनविण्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सिफेट लुधियानाचे प्रकल्प समन्वयक डॉ. एस.के. त्यागी, उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे व्यवस्थापक मुकुंद फळे, डॉ. कृषि विद्यावेत्ता विद्यासागर गेडाम, वरीष्ठ संशोधन अधिकारी डॉ. बापुराव गायकवाड व गुळ संशोधन केंद्राचे कनिष्ठ संशोधन अधिकारी डॉ. गोविंद येनगे व कोल्हापूर जिल्ह्यातील 45 गुळ उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वत:पुरता विचार न करता जिल्ह्यातील सर्व सामान्य गुळ उत्पादकांचा विचार करावा. गुळाचे ब्रॅडिंग करुन मुल्यवर्धन करणे आवश्यक आहे. व पणन व्यवस्था बळकट करण्यावरती भर देण्याची गरज असल्याची माहिती प्र. जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी दिली.

कोल्हापूर जिल्हा हा गुळासाठी जगप्रसिध्द आहे. तथापि मागील पाच वर्षापासून जिल्ह्यातील गुऱ्हाळगृहांची संख्या कमी झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामागील विविध कारणांपैकी गुळव्यांची उपलब्धता हे प्रमुख कारण आहे. गुळ व्यवसायामध्ये नवीन पिढीने पुढाकार घेऊन, गुळव्यांची कमतरता भरुन काढावी म्हणून दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले असल्याचे प्रस्ताविक करतांना डॉ. गेडाम यांनी सांगीतले.

पहिल्या दिवशी तज्ञांचे मार्गदर्शन असणार आहे, दुसऱ्या दिवशी प्रादेशिक गुळ संशोधन केंद्र, कोल्हापूर येथील सुरु असलेल्या गुऱ्हाळगृहावर प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष भौगोलिक मानांकन प्रमाणित निर्याक्षम गुळ बनविण्याच्या प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सिफेट लुधियानाचे प्रकल्प समन्वयक डॉ. एस.के. त्यागी, यांनी उपस्थितांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.

पोहाळे येथील गुळ उत्पादक सौ. आनंदी सिताराम चौगुले यांचा गुळापासून साखर तयार करुन, स्वत: मार्केटिंग करीत असल्याबद्दल प्र. जिल्हाधिकारी शिंदे यांनी कौतुक केले व त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे व गुळ उत्पादक शेतकऱ्यांचे आभार डॉ. घुले यांनी मानले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment