कोल्हापूर – गर्भलिंग निदान करून भ्रूणहत्या करणा-या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. कसबा वाळवे (ता. राधानगरी) आणि मडिलगे खुर्द (ता. भुदरगड) येथे मंगळवारी छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान चार संशयितांना अटक केली, तर दोन सोनोग्राफी मशिन आणि काही औषधे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गर्भलिंग निदान करणे आणि गर्भपात करण्यावर कायदेशीर बंदी असतानाही गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे रॅकेट जिल्ह्यात सक्रीय असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा आंबले-बरगे यांच्या पथकाने मंगळवारी राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथे एका घरावर छापा टाकून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून एक सोनोग्राफी मशिन जप्त केले. त्याचबरोबर मडिलगे खुर्द (ता. भुदरगड) येथे केलेल्या कारवाईत एका संशयिताला अटक करून सोनोग्राफी मशिन आणि काही औषधे जप्त केली.
या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. गर्भलिंग निदान रॅकेटमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील काही डॉक्टर, बोगस डॉक्टर, औषध विक्रेते आणि एजंटचा समावेश आहे. त्याचबरोबर कर्नाटकातील काही संशयितांचा ही यात समावेश असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा आंबले-बरगे यांनी दिली.
कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथे केलेल्या कारवाईत श्रीमंत तानाजी पाटील (रा. परिते, ता. करवीर), दत्तात्रय कृष्णात पाटील (वय ३२, रा. सिरसे, ता. राधानगरी) आणि सुनील रामचंद्र ढेरे (वय ३२, रा. आमजाई व्हरवडे, ता. राधानगरी) या तिघांना पोलिसांनी अटक केली. मडिलगे खुर्द (ता. भुदरगड) येथे केलेल्या कारवाईत विजय लक्ष्मण कोळस्कर (वय ३५, रा. मडिलगे खुर्द) याला अटक करण्यात आली. दोन्ही ठिकाणाहून पोलिसांनी दोन सोनोग्राफी मशिन जप्त केली आहेत.