पश्चिम महाराष्ट्र

फिल्मफेअर पुरस्कार विजेते दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांचा सत्कार

कोल्हापूर – अत्यंत प्रतिष्ठेचा फिल्मफेअर पुरस्कार विजेते दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांचा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २९ डिसेंबर) विद्यापीठात सत्कार होणार आहे.  हा कार्यक्रम अर्थशास्त्र अधिविभागाच्या सेमिनार हॉलमध्ये दुपारी पावणेचार वाजता होईल. सचिन सूर्यवंशी यावेळी पुरस्कार प्राप्त ‘वारसा’ हा लघुपट दाखवणार आहेत. शिवाय ते विद्यार्थी आणि उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी दिली.

सचिन सूर्यवंशी कोल्हापूरचे सुपुत्र असून त्यांना २०१९ मध्ये ‘द सॉकर सिटी’ या लघुपटासाठी पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर नुकताच ‘वारसा’ या लघुपटासाठी त्यांना २०२२ चा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या या क्षेत्रातील कामाची दखल घेऊन विद्यापीठात कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते सूर्यवंशी यांच्या सत्काराचे आयोजन केले आहे. वारसा या लघुपटामध्ये छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन सुरू असलेल्या मर्दानी खेळाचे स्वरूप आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मर्दानी खेळाचा हा वारसा जात असल्याबद्दल अतिशय नेटकी मांडणी केलेली आहे. यावेळी ‘वारसा’ या लघुपटाचे सादरीकरण होईल. लघुपट पाहिल्यानंतर त्याच्या निर्मिती प्रक्रियेविषयी ते विद्यार्थी आणि प्रेक्षकांशी संवाद साधतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून चित्रपट चळवळी विषयी आस्था असणाऱ्या नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment