पश्चिम महाराष्ट्र

रिक्षाचालकांना ‘डहाणू पॅटर्न’ द्वारे प्रथमोपचार प्रशिक्षण

पालघर – जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णालयांची कमतरता आणि वाढलेल्या रहदारीमुळे होणारे अपघात यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर अपघातग्रस्त रुग्णांना वेळेत प्रथमोपचार मिळावे यासाठी डहाणू येथे ‘डहाणू पॅटर्न’ राबवला जाणार आहे. गंभीर जखमी व इतर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी डहाणूतील तज्ञ डॉक्टरांमार्फत रिक्षाचालकांना प्रथमोपचाराचे धडे दिले जाणार असून यामुळे रिक्षाचालक रुग्णांसाठी देवदूत ठरणार आहेत.

ग्रामीण भागातील रस्त्यांवर रिक्षाचालक नेहमीच उपलब्ध असतात. त्यामुळे येथील रस्त्यांवर एखादा अपघात घडलाच तर त्या ठिकाणी सर्वात आधी पोहोचणारी व्यक्ती ही बहुतांशी वेळा रिक्षाचालकच असते. त्यामुळे याच रिक्षाचालकांना आता अपघातग्रस्त जखमींवर प्रथमोपचाराचे धडे दिले जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत ४० रिक्षा चालकांचा समूह तयार करून डहाणूतील तज्ञ डॉक्टरांसह गुजरात राज्यातील वापी येथील हरिया या नामांकित रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर रिक्षाचालकांना प्रथमोपचाराचे धडे देणार आहेत.

प्रात्यक्षिकांद्वारे रुग्णांचा जीव वाचवण्यात महत्त्वाची ठरणारी प्रथम उपचार पद्धती त्यांना या उपक्रमातून अनुभवता व शिकता येणार आहे. जखमीला कृत्रिम श्वासोत्सवास देणे, रक्तस्त्राव थांबवणे, घायाळ व्यक्तीला हाताळणे, जायबंदी झालेल्या व्यक्तीला हाताळणे या सर्व बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणात सहभाग घेणाऱ्या रिक्षाचालकांना बॅच आणि प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णालयातून येणाऱ्या ॲम्बुलन्सची वाट न बघता रिक्षा चालकांनी यात पुढाकार घेतल्यास वर्षाकाठी अपघातातील पाच तरी जखमींचा जीव नक्की वाचेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग, पश्चिम रेल्वे, बुलेट ट्रेन, मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हे सगळे देशाला जोडणारे प्रकल्प पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी सारख्या ग्रामीण भागातून जात असून या ठिकाणी सध्या रहदारीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या परिसरात अपघातांची संख्या ही वाढली असून ग्रामीण भागात सुसज्ज अशी रुग्णालय नसल्याने अपघातांमध्ये जखमी झालेल्यांची मोठी गैरसोय झालेली दिसून येते. अनेक वेळा वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव ही गमवावा लागला आहे. त्यामुळे या भागात अपघातात होणाऱ्या जखमींच्या मदतीसाठी डहाणूतील ऑर्थोपेडिक डॉ. सोहोनी आणि त्यांची टीम पुढे सरसावली असून डहाणू पॅटर्न नावाने एक अनोखा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन डहाणू शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय सोहनी व त्यांचा समूह, अदानी सामाजिक उत्तरदायित्व शाखा व रिक्षाचालक-मालक संघटना या उपक्रमात सहभागी आहेत. ‘डहाणू पॅटर्न’ यशस्वी ठरला तर सरकारने याचा विचार करून हा उपक्रम राज्यभर अंमलात आणावा अशी मागणी डहाणूतील डॉक्टरांनी केली आहे. त्याचप्रमाणे अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या या रिक्षाचालकांना काही सवलती देता येतील का याचाही सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा असे देखील या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment