महाराष्ट्र

इतिहासात प्रथमच राजपथावर रंगणार कोल्हापुरातील मर्दानी खेळांचा थरार

प्रजासत्ताकदिनी इतिहासात प्रथमच शिवकालीन मर्दानीखेळ प्रात्यक्षिकांना संधी, रंगणार कोल्हापुरातील मर्दानी खेळांचा थरार

By: अनुराधा कदम

अंगात सळसळणारा उत्साह आणणारा हलगीचा ठेका, कैचाळाच्या साथीने घुमणारी घुमकं, कितीही नजर रोखून पहायची असं ठरवलं तरीही नजरेतून सपासप सुटणारा लाठीचा फेरा, दांडपटटय़ाची ती श्वास रोखायला लावणारी फिरकी, गळय़ावर ठेवलेल्या लिंबाचा मधोमध वेध घेणारा तलवारीचा अचूक वार, डोळय़ाचे पाते लवते न लवते तोच मानेवरच्या पानाचे तलवारीने दोन भाग करणारे कसब हे मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांत पाहताना अंगावर काटा येतो. 

शिवकाळातील ही मर्दानी खेळांची परंपरा आजही महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पिढय़ानपिढय़ा जपली जाते. परदेशीच नव्हे तर देशातील पर्यटकांसमोर मर्दानी खेळांचा थरार दाखवताना अभिमानाने ऊर भरून येत असतो. याच मर्दानी खेळांचा थरार 26  जानेवारी 2022च्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील राजपथावर रंगणार आहे. वैशिष्टय़ म्हणजे राजपथावरील प्रात्यक्षिकांच्या आजवरच्या इतिहासात शिवकालीन मर्दानी खेळ सादर करण्याची संधी कोल्हापुरातील स्वराज्य रक्षक शिवबांचा मावळा या संघाच्या 12 मावळय़ांना मिळाली आहे. सध्या कोल्हापुरातील हे मावळे सराव करत असून राजपथावर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी देशभरातील चार हजार कलासंघातून कोल्हापुरी मर्दानी खेळांवर शिक्कामोर्तब झाले.


मर्दानी खेळांना सुमारे सातशे वर्षांची परंपरा आहे. सोळाव्या शतकात मर्दानी खेळांचा विकास झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या सेनेचा सामना करण्यासाठी छापामार युध्दपध्दती आस्तित्वात आणली तेव्हा शस्त्र चालवण्याचे हे खेळ उदयास आले. 

शत्रूच्या नजरेला गाफील ठेवत कधी आणि कुठून हल्ला होईल यापासून साशंक ठेवण्यासाठी मर्दानी खेळांची रचना तयार झाली. शिवकाळ संपला तरी आजही स्वराज्याच्या रणनितीचा पाया असलेल्या मर्दानी खेळांचे प्रशिक्षण देणारे संघ महाराष्ट्रात आजही सक्रिय आहेत. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सांगोला, पुणे, बारामती,  मावळ, अहमदनगर या शहरांमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांची परंपरा जतन केली आहे. पर्यटकांना महाराष्ट्राची ऐतिहासिक व शौर्याची परंपरा दाखवण्यासाठी मर्दानी खेळात महत्त्व असते ते तीन गोष्टींना. 

पवित्रा, नजर आणि शस्त्र फिरवण्याची गती. पवित्रा म्हणजे तुमच्या शरीराचा समतोल कसा साधता यावर तुमची प्रतिकाराची शक्ती ठरते हे साधं तत्त्व मर्दानी खेळांच्या सरावावेळी उलगडते. तलवारीपासून भाल्यापर्यंत कुठलेही शस्त्र घेतले तर त्यात वार कसा करायचा याचे किमान १४ प्रकार पडतात. तलवार हातात धरली तर त्याचा वार शक्यतो थेट असतो. 

मर्दानी खेळाच्या भाषेत शीरवार, बाजूवार, बगलवार असेही प्रकार येतात. बैठेवार आणि चोरवारही असतात. ‘वार’ म्हणजे तोडणे. त्यामुळे दुधारी असलेल्या पट्ट्याचा वार आडवाच फिरतो; कारण समोरच्या शत्रूला एका झपाट्यात संपवायचे असते. पट्टा सरळ पकडावा लागतो, तर तलवार सरळ. लांब अंतरावरच्या शत्रूला टिपायचे तर भालाच चांगला, पण भालाफेक केल्यानंतर हाती शस्त्र उरत नाही. 

त्यामुळे मराठ्यांनी विकसित केलेले शस्त्र म्हणजे विटा. अस्त्र आणि शस्त्र या दोन्ही प्रकारांत ते वापरता येतं. इंग्रजांच्या काळात या शस्त्राला गौरवले गेले. लांब अंतरावरच्या शत्रूला टिपून पुन्हा फिरून आपल्या हाती येणारे हे शस्त्र. पन्हाळगडावर वीर शिवा काशीद यांच्या उभारलेल्या पुतळ्याच्या हातीही हेच शस्त्र आहे. यात फेक अचूक लागते, अन्यथा ते बुमरँग होण्याची शक्यता असते. 

हे शिवकालीन शस्त्रभांडार आजही जपले आहे. हे सारे शिकवले जाते, ते मर्दानी खेळांमध्ये. अर्थात, प्राचीन युद्धकला किंवा स्वसंरक्षण, बलोपासनेचा मुख्य उद्देश म्हणून. कालानुरूप मर्दानी खेळाच्या प्रकारात बदल झाले. शस्त्र वापरण्यास बंदी असल्याने ढाल-तलवारीऐवजी फरीदगा आला. लढाईचे प्रत्यंत्तर देणाऱ्या, अचूकतेचा मंत्र देणाऱ्या, तलवारीने लिंबू कापण्याच्या प्रकारानेही मूळ धरले. झोपलेल्या मावळ्याच्या मानेवर खाऊचे पान ठेवून त्याचे तलवारीच्या पात्याने अचूक तुकडे करण्याचा प्रकारही थरारक असतो.

अशी झाली निवड… 

आता कसून सराव
देशभरातून चारहजार संघ दाखल झाले होते. त्यातून 480 संघ निवडले गेले त्यामध्ये कोल्हापुरातील स्वराज्य रक्षक शिवबांचा मावळा या संघाचा समावेश झाला. त्यातून 75 संघ निवडले जाणार होते. त्यासाठी मुंबई येथे प्रात्यक्षिक चाचणी झाली. त्यातून महाराष्ट्रातील जे दोन संघ निवडले त्यामध्ये कोल्हापूरच्या मर्दानी खेळाची वर्णी लागली तर दुसरा डान्सग्रुप आहे. 

या सादरीकरणासाठी संघाचे सर्व खेळाडू दिवसातील सहा तास सराव करत आहेत. कोल्हापूरला मर्दानी खेळाची फार मोठी परंपरा आहे. देशाच्या राजधानीत प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणारया संचलनालयात मर्दानी खेळ सादर करण्याची संधी शाहू महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या कोल्हापूरच्या मावळय़ांना मिळतेय याचा फार मोठा आनंद व समाधान कोल्हापूरकरांना वाटत आहे

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment