ठाणे – राज्यात बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप मांडीला मांडी लावून सत्ता चालवत असताना आता मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिंदे गटाच्या काही माजी नगरसेवकांच्या जमावाने भाजपच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप ठाण्यातील भाजप कडून करण्यात आला आहे. तसे ट्विट भाजप कडून करण्यात आले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेचा ठाण्यातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट झालेले चित्र आणि दोघांमध्ये नेहमीच होत असलेले वाद पाहायला मिळाले आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि आणि भाजप मांडीला मांडी लावून सत्तेत बसून राज्यच समीकरण हाकतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. अशी राजकीय समीकरण सुरु असताना आता ठाण्यातील शिंदे गटाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांच्या जमावाने भाजप ठाणे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करत ट्विटरवर पोस्ट केली आहे. अशा प्रकारच्या घटना आमच्यासोबत खूप वेळा घडला आहे त्याबाबत आम्ही पोलीस ठाण्यात देखील धाव घेतली आहे. या शिंदे गटाचे स्थानिक माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांनी या आधी देखील अशाच प्रकारे गुंडांच्या मदतीने हत्यार घेऊन आमच्या घरावर हल्ला केला असल्याचा घणाघाती आरोप देखील यावेळी भाजप पदाधिकारी प्रशांत जाधव यांचे भाऊ संदीप जाधव यांनी केला आहे.
आमच्या सोबत घडलेली घटना हि तिसरी घटना आहे. या हल्ल्यात प्रशांत जाधव यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या डोक्याला ९ टाके पडले आहेत आणि आता सिव्हिल रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या पक्षातील अंतर्गत झालेला वाद हा बॅनर लावण्याच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे अशा प्रकारे दहशत पसरवणाऱ्या तेथील स्थानिक माजी नगरसेवकांवर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होत नसल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संदीप जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार संजय केळकर आणि भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे केली आहे.
भाजपच्या पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर प्रशांत हे गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरु असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. प्रशांत हे पोलिसांना सविस्तर जबाब देणार असल्याचे देखील संदीप यांनी सांगितले. या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडियो देखील समोर आला आहे. या सीसीटीव्ही व्हिडियो च्या अनुषंगे संदीप यांनी महिला माजी नगरसेविका नम्रता भोसले यांना पुढे करून हा हल्ला केला असल्याचा आरोप केला आहे.
आता हा हल्ला करण्यामागचे कारण काय? या प्रकारात नेमके कोण होते? आणि नक्की हा वाद कशामुळे झाला हे मात्र पोलीस तपासानंतर स्पष्ट होईल.. मात्र भाजप कडून करण्यात आलेल्या या आरोपामुळे ठाण्यातील शिंदे गट आणि भाजपचा ठाण्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळाला आहे.