कोल्हापूर – किरकोळ कारणातून सुरज नंदकुमार घाटगे (वय 24, रा. आंबिल कट्टा, कागल) याच्या खूनप्रकरणी सिद्धेश कुशनचंद चव्हाण (वय 29, रा.रेल्वेलाईन, ठाकरे चौक, कागल) व वैभव अमरसिंग रजपूत (26, जुनी बस्ती गल्ली, कागल) या दोघांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. कागल येथील आंबिलकट्टा रोडवर 8 जून 2019 रोजी ही घटना घडली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश (3) तांबे यांच्यासमोर सुनावणी झाली. सुरज हा सुरेखा घाटगे यांचा एकुलता मुलगा होता. मोटार भाड्याने देण्याचा त्याचा व्यवसाय होता. दोन्हीही आरोपी सुरजचे मित्र होते. 8 जूनला सुरज घरी असताना तीन तरुण सुरजला घेऊन महामार्गाच्या दिशेने गेले.
काही वेळानंतर त्यांचा शेजारी दिनकर घाटगे याने सुरजला मारहाण झाल्याचे सांगितले. आई व बहीण घटनास्थळी गेल्या. सुरज रक्ताच्याथारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याला सीपीआरमध्ये हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. फिर्यादी सुरेखा घाटगे, गौरव नाईक, सुरजची बहीण प्रेरणा घाटगे यांच्या साक्षी झाल्या. मात्र त्या फितूर झाल्याचे सरकारी अभियोक्ता अॅड. मंजुषा पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरुनाथ दळवी, पंच साक्षीदार अनंतकुमार खोत, तलाठी संजय सुतार, अरुण हणवते यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी अभियोक्ता अॅड. पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्हीही मारेकर्याना जन्मठेप सुनावणी. तत्कालीन उपनिरीक्षक पी. पी. पुजारी यांनी तपास केला होता.