पश्चिम महाराष्ट्र

घोडावत विद्यापीठाचे विद्यार्थी घेणार इंग्लंडमध्ये प्रशिक्षण

जयसिंगपूर – परदेशी शिक्षण कार्यक्रमांतर्गत आपत्कालीन व्यवस्थापन विषयक अभ्यासासाठी संजय घोडावत विद्यापीठातील चार विद्यार्थी १५ दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी इंग्लंडला रवाना झाले. हे विद्यार्थी टीसाईड युनिव्हर्सिटी यूके येथे प्रशिक्षण घेणार आहेत. यासाठीचा सर्व खर्च ब्रिटिश कौन्सिलने दिलेल्या फंडातून घोडावत विद्यापीठ करत आहे.

या अगोदर टीसाईड युनिव्हर्सिटी, यूके  आणि इतर भारतातील सहभागी विद्यापीठाद्वारे घोडावत विद्यापीठात आपत्कालीन व्यवस्थापन विषयक आंतरराष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये आकाश वरदे, आकांक्षा तळवलकर, वरद बागेवाडी, वेदिका नरोटे या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. हे विद्यार्थी आता पुढील प्रशिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले आहेत. या संदर्भात कुलगुरू डॉ. अरुण पाटील यांनी यापूर्वीच टीसाईड युनिव्हर्सिटी येथे भेट देऊन घोडावत विद्यापीठाचे संबंध दृढ केले आहेत.

हे विद्यार्थी प्रशिक्षणा दरम्यान  इंग्लंडमधील सार्वजनिक आरोग्य सुविधा स्थळांना भेट देतील. विमानतळ सुरक्षा टीमशी संवाद साधतील. तेथील फुटबॉल स्टेडियमची सुरक्षा आणि काळजी घेणाऱ्या टीमशी बातचीत करून त्यांचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन समजून घेतील. तेथील सामाजिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदांना, आपत्कालीन नियोजन आणि प्रतिसाद विषयक कार्यशाळेला उपस्थित राहतील. सुरक्षा विषयक विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन टीसाईड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटिश कौन्सिल मधील विविध मान्यवरांच्या ते मुलाखती घेतील.

इंग्लंडमध्ये  पुढील प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी शुभेच्छा दिल्या. यासाठी ग्लोबल एंगेजमेंटचे संचालक डॉ. केसरी तिवारी, अधिकारी अमृता हंदूर, सहयोगी अधिष्ठाता प्रा.संजय कुमार इंगळे यांनी परिश्रम घेतले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment