महाराष्ट्र राजकारण

देवाच्या दारी राजकारण्यांची वारी, गोव्यात कुणाची लागेल मुख्यमंत्री पदी वर्णी

देवाच्या दारी राजकारण्यांची वारी, गोव्यात कुणाची लागेल मुख्यमंत्री पदी वर्णी 
विवेक ताम्हणकर, कोंकण 
गोवा विधानसभेची मतमोजणी १० मार्चला होत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते प्रमोद सावंत यांनी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचे दर्शन घेऊन अभिषेक केला. मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी देखील शनिच्या चरणी डोके ठेवले.

सध्या देवाच्या दारी राजकारण्यांची वारी सुरु असताना गोव्यात संभाव्य विजयी होणाऱ्या उमेदवारांमधून काही लोकांना स्वतःच्या गळाला लावून सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा मधून आताच चाचपणी सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांची भेट घेतली आहे.

गाठीभेटीचा सिलसिला आता जोरात सुरु झाला असताना विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या जागी आरोग्यमंत्री विश्वजित राणे स्वतःची वर्णी लागण्यासाठी जोरदार लॉबिंग करताहेत. तर ढवळीकर हे स्वतःचा भाव वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. काँग्रेस नेहमीप्रमाणे शांत चाल चालत आहे.

  विधानसभेच्या सर्व चाळीसही मतदारसंघातील १७२२ मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची १० मार्च रोजी मतमोजणी होत आहे. यावेळी ७८.९४ टक्के मतदान झाले असून अंदाजे २६ हजार पोस्टल बॅलेट मतदान अपेक्षित आहे. यासाठी ९ राजकीय पक्षांसह अपक्ष असे ३०१ उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणीसाठी काही दिवस उरले असून आयोगाने दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मतमोजणीची तयारी जोरात सुरू केली आहे. १० मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

उत्तर गोव्यासाठी १९ मतदारसंघाची मतमोजणी पणजी येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे होत असून, दक्षिण गोव्यातील २१ मतदार संघासाठी दामोदर महाविद्यालय, मडगाव येथे मतमोजणी होणार आहे. त्यासाठी ९०० कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.
राज्‍यात पुन्‍हा एकदा भाजपचे सरकार पूर्ण बहुमतांसह सत्तेत येईल असा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला. सत्तास्थापनेसाठीचे आवश्‍‍यक ते सर्व प्रयत्न भाजप करेल. यासाठी समविचारी पक्ष आणि अपक्ष उमेदवारांशी विविध पातळ्यांवर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सत्तास्थापनेसाठी काही जागा कमी पडल्या तर त्या कशा मिळवाव्‍यात यासाठी भाजपने मंथन सुरू केलेले आहे. प्रभारी आणि केंद्रीय नेतृत्वही यासाठी विशेष प्रयत्न करेल असे संकेत तानावडे यांनी दिले.

२०१७ मध्ये काँग्रेसकडे १७ आमदार असतानाही भाजपने बाहेरच्या बाहेर लॉबिंग करून आपले १३ आमदार असतानाही सरकार घडविले होते. मागच्यावेळी हे लॉबिंग करण्यात स्व. मनोहर पर्रीकर यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी ती जबाबदारी विश्वजीत राणे व बाबुश मोन्सरात यांनी प्रामुख्याने घेतली आहे. यावेळी भाजपची गाडी १४ पर्यंतच अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात असून काँग्रेसही १६ च्यावर जाणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंचे नेते फोडाफोडीच्या राजकारणात आतापासूनच सक्रिय झाले आहेत. सध्या भाजपच्या बाजूने विश्वजीत राणे व बाबुश मोन्सरात यांनी अन्य पक्षातील संभाव्य आमदारांशी संपर्क साधणे सुरू केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व माविन गुदिन्हो यांनीही काही संभाव्य विजेत्यांशी संपर्क साधला असून ते दोघे काँग्रेसच्याही आमदारांना फोडू पहात असल्याचा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
यातच मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना धक्का देणारे विधान केले आहे. विश्‍वजीत राणे हे सध्या नव्या सरकारच्या नेतृत्वाचे दावेदार आहेत.

राणे यांच्याशी आमची २ ते ३ दिवसाआड भेट होत असते. मात्र, या भेटीचा कोणी राजकीय अर्थ काढू नये, असे सांगून सुदिन ढवळीकर यांनी अप्रत्यक्षरित्या विश्‍वजीत राणे यांच्या मुख्यमंत्री पदाला समर्थन दिले आहे. मुख्यमंत्री पदासाठी भाजपमधील (BJP) आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे अशावेळी सध्याच्या घडीला विश्‍वजीत राणे हेच नेतृत्वासाठी पात्र दावेदार आहेत असे मत मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केल्याने मतमोजणीपूर्वीच सरकार स्थापनेसंदर्भात हालचालींना सुरवात झाल्याचे हे संकेत आहेत. माझे त्यांच्यासोबत 1980 पासूनचे नाते आहे.

त्यांचे वडील प्रतापसिंह राणे यांच्याशी जुनी मैत्री आहे, असे स्पष्टीकरण सुदिन ढवळीकर यांनी यावेळी दिले. विशेष म्हणजे अनेकवेळा सत्ता स्थापनेत भाजपला मगोपने मोठी मदत केली आहे. यावेळी भाजपाकडे मनोहर पर्रीकर यांच्यासारखे ताकदीचे नेतृत्व नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेत मगोपची भूमिका आल्यास विद्यमान मुख्यमंत्र्यांना पुन्हा संधी मिळणे कठीण आहे. कारण  मगोप विश्वजित राणे यांच्या नावाचा आग्रह धरू शकते. तसा अंदाज ढवळीकर यांनी आधीच देऊन ठेवला आहे.

 विशेष म्हणजे तापलेल्या राजकीय तव्यावर आपली पोळी चांगल्या प्रकारे भाजून घेण्याची कला अवगत असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने गोव्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता गृहीत धरून राजकीय बाजारात आपली बोली वाढविण्याचे धोरण अवलंबिले आहे. विश्वजित राणे यांचे नाव पुढे करणे हा देखील याच योजनेचा भाग आहे. 

दरम्यान गोव्यातील निवडणुकीनंतरचे निकाल येण्यापूर्वीच तृणमूल काँग्रेसने  आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत. गोव्याचे तृणमूल काँग्रेसचे  प्रमुख किरण कांदोळकर यांनी प्रशांत किशोर  यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. किशोर गोव्यात टीएमसीचे राजकीय सल्लागार म्हणून काम करत होते. पण आता पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांची I-PAC कंपनी नीट काम करत नसल्याचा आरोप केला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांच्यावरील खप्पामर्जी स्पष्ट झाली आहे.

पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलेल्या नवीन राष्ट्रीय समितीत फालेरो यांना स्थान दिलेले नाही. फालेरो हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत गोव्यात तृणमूल पक्षाला उभारी मिळणार अशी आय पॅकचे प्रशांत किशोर व ममता बॅनर्जी यांना अपेक्षा होती. पण ऐन निवडणुकीच्या काळात ते प्रभावहीन झालेले दिसून आल्यावर त्या दोघांचाही अपेक्षाभंग झाला आहे.
दरम्यान गोव्यात सध्या काँग्रेस शांतपणे पावले टाकत आहे.

तर भाजपा पक्षाने साखळीचे उमेदवार आणि सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला असताना देखील भाजपमध्येही गटबाजी सुरू झाली आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचेही नाव या मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. तर मगोपच्या ढवळीकर यांनाही मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडू लागली आहेत. एकंदरीत गोव्यातील राजकीय साठमारीला जोरात सुरवात झाली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment