कोल्हापूर – शहराच्या हद्दवाढीसाठी प्रस्तावांचा विचार करून एक महिन्यात बैठक घेण्याचे ठाम आश्वासन यासह अंबाबाई मंदिराचे सुशोभीकरण, शहरातील खराब रस्ते दुरुस्त करण्यासाठी १०० कोटींचा निधी यासह जिल्ह्याच्या विकास आराखडा ५५० कोटींवर, असे धडाकेबाज निर्णय घेत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूरच्या विकासाला गती देण्यासठी ठोस पावले उचलली आहेत.
विकासाच्या फाईलींवर वर्षांनुवर्षे साचलेली धूळ झटकून या फाईली गतीमान केल्या आहेत. केवळ त्याचे आदेश न देता अधिकार्यांना त्याचा कालबद्ध कार्यक्रम आखून देत जनतेला ठरावीक काळात विकास करून दाखवण्याची हमी दिली आहे. द्दवाढीच्या हालचाली हद्दवाढीचा प्रस्ताव गेली ५० वर्षे लोंबकळत पडला आहे. या प्रस्तावाला हात लावण्याची हिंमत कोणी दाखवली नाही; मात्र केसरकर यांनी अभ्यास करून एक महिन्यात बैठक घेऊ, असे सांगत शहरालगतची जी गावे विकसित झाली आहेत अशा शहरीकरण झालेल्या गावांसह हद्दवाढ करण्याच्या ‘क्रीडाई’च्या प्रस्तावाचाही विचार करण्याचे आश्वासन दिले. हद्दवाढीच्या द़ृष्टीने त्यांनी हे भक्कम पाऊल उचलले आहे. त्याचवेळी प्राधिकरणातील त्रुटींवर लोकप्रतिनिधींनी बोट ठेवल्यानंतर त्याचीही दखल घेतली आहे.
मंदिर परिसर विकास अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षभरात येणार्या भाविकांची संख्या कोटींच्या घरात गेली आहे. मात्र त्यांच्यासाठी पुरेशा सुविधा नाहीत. हे लक्षात घेत पालकमंत्र्यांनी मंदिर परिसराचे सुशोभीकरण येत्या मार्च अखेर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यास सांगून त्यालाही सात दिवसांची मुदत दिली आहे. मंदिर परिसरात जागेची अडचण होती ती दूर करण्यासाठी भवानी मंडपातील सर्व शासकीय कार्यालयांचे स्थलांतर करण्यात आले असून या रिकाम्या जागेचा वापर आता भाविकांना सुविधा देण्यासाठी होणार आहे. त्याचबरोबर दहा दिवसांचा दसरा महोत्सव करण्याबाबतचे नियोजन करण्याचे आदेश देऊन केसरकर यांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे.
पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी…
पंचगंगा प्रदूषण रोखणे, त्याचबरोबर ऐतिहासिक शिवाजी पुलाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करणे, पंचगंगा नदी घाट विकसित करणे आणि तेथील समाधीस्थळांचे जतन करणे या कामालाही आता गती देण्याचे आदेश देण्यात आले. पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जे निर्णय घेण्यात आले होते, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश देत केसरकर यांनी पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्याच्या द़ृष्टीने ठाम पाऊल उचलले आहे. त्याचवेळी कोल्हापुरातील खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. यापैकी काही रस्ते आता सिमेंटचे होणार आहेत. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार महापालिका यंत्रणेने काम केले तर शहरवासियांचा खड्ड्यातून होणारा प्रवास थांबणार आहे. जिल्ह्याचा विकास आराखडा ५५० कोटी रुपयांचा असणार आहे. आता अंतिम मान्यता किती मिळणार हे स्पष्ट होईल. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठा निधी मिळेल. मेन राजाराम हायस्कूलला विशेष निधी देण्याचे जाहीर करुन पालकमंत्र्यांनी विरोधकांना चोख उत्तर दिले आहे. त्याचवेळी महाविद्यालयासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचे जाहीर केले आहे.
आयटी पार्कला मिळणार गती
शेंडा पार्क येथील आयटी पार्कसाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. त्याच ठिकाणी उच्च न्यायालायाचे खंडपीठ, क्रीडा संकुल, जिल्हाधिकारी कार्यालयासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे नियोजन आहे असेही पालकमंत्री म्हणाले. आयटी पार्कसाठी शेंडा पार्कात जागा आरक्षित ठेवल्याचे जाहीर केल्यामुळे आयटी पार्कलाही गती मिळणार आहे.
भाऊसिंगजी रोडला हेरिटेज लूक
जुना राजवाडा ते नवीन राजवाडा या भाऊसिंगजी रोडला पूर्वीपासून महत्त्व आहे. त्याला ऐतिहासिक आणि राजेशाही वारसा आहे. हा रोड आता हेरिटेज म्हणून विकसित होईल. या मार्गावर ऐतिहासिक इमारतींवर रोषणाई करुन तेथे माहिती फलक लावले जातील. यामुळे पर्यटकांसाठी ते आकर्षण केंद्र होईल.