मनोरंजन

सुख म्हणजे नक्की हेच असतं…. देवकी फेम मीनाक्षी राठोडला झाली मुलगी

सुख म्हणजे नक्की काय असतं असं ऑनस्क्रिन म्हणणाऱ्या अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिने खऱ्या आयुष्यात तिच्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. तशी या गोड बातमीची चाहते वाट पाहतच होते. कारण तिने तिच्या बेबी बम्पसोबत खूप सारे काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

तिच्या डोहाळेजेवणापासूनच चाहत्यांना ती आई झाल्याची बातमी कधी देतेय याची उत्सुकता लागली होती. मीनाक्षीने मुलीला जन्म दिला असून मुलगी झाली हो अशा शब्दात तिने हा  आनंद सोशल मीडियावर साजरा केला आहे. खऱ्या आयुष्यात मीनाक्षीच्या आई या नव्या भूमिकेला चाहत्यांनी खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकप्रिय असलेल्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मीनाक्षी देवकी ही भूमिका साकारत आहे. काहीशी वेंधळी, मनात काही नाही पण कुणाच्यातरी सांगण्यावरून वाईट वागणारी देवकी प्रेक्षकांना आपलंसं करण्यात यशस्वी झाली आहे.

तिच्या बोलण्याचा लहेजा प्रेक्षकांना आवडत असल्याच्या प्रतिक्रिया नेहमी येत असतात. सोशल मीडियावरही मीनाक्षी खूप अॅक्टीव्ह असते. तिचा पती कैलास वाघमारे हा अभिनेता असून त्यानेही अनेक नाटक, मालिका, सिनेमा यामध्ये काम केले आहे.

दोन महिन्यांपूर्वी मीनाक्षीने तिच्या डोहाळेजेवणाचे फोटो शेअर करत ती आई होणार असल्याची बातमी दिली होती. तसेच प्रेग्नन्सीतील फोटोग्राफीचा आनंदही मीनाक्षी आणि कैलास यांनी घेतला होता.

मीनाक्षीचा प्रेग्नन्सी लुक व्हायरल झाला होता. त्यानंतर मीनाक्षी आणि कैलास यांनी नवी कार खरेदी केल्याचे फोटोही पोस्ट केले होते. दोनाचे चार झालो अशी हटके कॅप्शन खूप व्हायरल झाली होती.

दरम्यान मीनाक्षी अगदी नवव्या महिन्यापर्यंत सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत काम करत होती. त्यासाठी तिला मालिकेच्या टीमने सहकार्य केल्याचंही तिने सांगितलं होतं. गेल्या दोन आठवडयापूर्वी तिने मालिकेतून ब्रेक घेतला आणि तिच्या जागी देवकी म्हणून भक्ती रत्नपारखी दिसत आहे.

मूळची जालन्याची असलेल्या मीनाक्षीला शालेय वयापासूनच अभिनयाची आवड आहे. शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकात तिने काम केलं आहे. या नाटकाने तिला प्रसिध्दी दिली.

खिसा या तिच्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मीनाक्षीने यापूर्वी बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत काम केलं आहे.  सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील खट्याळ खलनायिका तिने उत्तम साकारली आहे. सध्या तरी मालिकेतून ब्रेक घेत मीनाक्षी आईपणाचा अनुभव घेत असून घरी आलेल्या नव्या पाहुणीसोबत तिचं सुख म्हणजे हेच असतं असं सांगत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment