हर हर महादेव सिनेमावरून युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी झी स्टुडिओला इशारा दिला आहे. झी टीव्ही वरुन येत्या अठरा डिसेंबरला हा सिनेमा जर दाखविला तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी चुकीच्या पद्धतीने चित्रण केले आहे असा आक्षेप यापूर्वी शिवभक्तांनी नोंदवला आहे. युवराज संभाजीराजे यांनी या सिनेमाला विरोध केला होता. संभाजीराजे व स्वराज्य संघटनेचा आक्रमक पवित्रा घेतल्यावर हर हर महादेव हा चित्रपट थिएटरमध्ये दाखविणे बंद झाले. आता १८ डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी इशारा दिला आहे.
“इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केले आहे. या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल.” असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.