मनोरंजन

ही अभिनेत्री आहे या कलेतही पारंगत… नुकतीच घेतली पदवी

अभिनय क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत की जे कॅमेऱ्यासमोर तर उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतातच पण त्यांच्या अंगी काही वेगळया कलाही असतात ज्यामुळे प्रेक्षकांनाही कौतुक वाटतं. जसं की काही अभिनेते व अभिनेत्री गायन करतात, काही कविता रचतात. काहीच्या हातात पाककौशल्य आहे तर काहीजण नृत्यातही निपुण आहेत. अर्थात अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून करिअर करताना नृत्यकौशल्य, घोडेस्वारी, पोहण्याचं कौशल्य असेल तर त्यांना त्याचा फायदाच होतो. आता याच अभिनेत्रीचं बघा. नुकतीच या अभिनेत्रीने कथक विषयात पदवी मिळवली. सोशलमीडियावर तिने पदवीसह फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. ही अभिनेत्री आहे सध्या दार उघड बये या मालिकेत मुक्ता ही भूमिका साकारत असलेली सानिया चौधरी. सानियावर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 
सानिया ही मूळची पुण्याची आहे. तिला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड होती. या दोन कलांमध्येच करिअर करण्याचा तिने निर्णय घेतला होता. पण त्यासाठी तिला खूपच संघर्ष करावा लागला. ऑडीशन देण्यासाठी सानिया नेहमीच पुणे ते मुंबई असा प्रवास करायची. खूप प्रयत्न केल्यानंतर तिला साजणा ही पहिली मालिका मिळाली. या मालिकेतील तिच्या भूमिकेचं कौतुक झालं. त्यानंतर तिला सांग तू आहेस का या मालिकेत अभिनेता सिध्दार्थ चांदेकरसोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली. या मालिकेतील तिची भूमिकाही खूप वेगळी होती. सध्या सानिया दार उघड बये या मालिकेत मुक्ताच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतील मुक्ताच्या भूमिकेची गरज म्हणून तिने खास संबळ हा वादयप्रकार वाजवण्याचे धडेही गिरवले.
 
दरम्यान सानियाला कथ्थक या नृत्यकलेत पदव्युत्तर पदवी घेण्याची इच्छा होती. तिचं हे स्वप्न साकार झालं. गुरू अस्मिता ठाकूर यांच्याकडे तिने कथकचे शिक्षण घेतले आहे. सानिया अमेरिकन आणि लॅटीन नृत्यप्रकारातही पारंगत आहे. पुण्यातील भारती विद्यापीठातून सानियाने कथ्थकमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत सानियाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने असं लिहिलं आहे की, कथ्थक या नृत्यात मास्टर होण्याचं स्वप्नं साकार झाल्याचा खूप आनंद आहे. गेल्या तीन वर्षापासून अभिनय आणि नृत्य यासाठी माझी कसरत सुरू होती, पण या मेहनतीला फळ आलं. सांग तू आहेस का या मालिकेच्या सेटवर मी कथ्थक नृत्याची पुस्तकं वाचत असायचे. अनेकदा गुरू अस्मिता यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवर मार्गदर्शन घ्यायचे. माझ्यासाठी मालिकाही महत्वाची होती आणि कथ्थकचा अभ्यासही महत्वाचा होता. त्यामुळे शूटिंगसाठी मुंबई तर परीक्षेसाठी पुणे असा प्रवास करावा लागला. हा सगळा प्रवास खूप अविस्मरणीय आहे. सानिया चौधरीने तिच्या आयुष्यातील ही बातमी शेअर करत या प्रवासात तिला साथ दिलेल्या प्रत्येकाची विशेष आभारही मानले आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment