मुंबई :
राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येणार असल्याचे गृहखात्याकडून जाहीर करण्यात आले आहे. कोरोना काळात पोलीस दलातील घटलेली कर्मचारी संख्या, निवृत्त अधिकारी आणि मागील दोन वर्षात फूलटाईम भरती न झाल्याने पोलिसांवरील वाढलेला दबाव पाहता गृहखात्याने पोलीस भरती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
दरम्यान, यावेळी टीईटी, लष्कर आणि आरोग्य परीक्षांमध्ये समोर आलेल्या घोटाळ्यांमुळे गृह खाते स्वतच ही भरती प्रक्रिया पार पाडणार आहे.
भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही एजन्सीला कंत्राट देणार नसल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे. सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता गृहखात्याचा हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर झाला आहे. भरती प्रक्रियेचे अधिकार प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना मिळणार असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.
मागील पाच वर्षांपासून गृह खात्यात कर्मचार्यांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रीमंडळात प्रस्ताव मांडला होता. त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. राज्यातील पोलीस दलात 7 हजार 200 नव्याने कर्मचारी भरती केले जाणार आहेत.
यासाठी उमेदवारांची अंतिम यादी पुढील महिन्यात जाहीर करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितले. तर, भरतीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले. राज्यात सध्या 7 हजार 200 पोलिसांशी भरती करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी झाली आहे. पात्र उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. दुसर्या टप्प्यात राज्यात सात हजार 200 पोलिसांच्या भरती संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये या भरती प्रक्रियेला प्रारंभ केला जाईल, अशी माहिती गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिली.